पंकजा मुंडेंना खूप अहंकार, त्यांनी तो सोडावाः नामदेव शास्त्रींचा सल्ला; प्रत्युत्तरात पंकजा म्हणाल्याः मी जर जोरात…


बीडः अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी येथे आयोजित नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलताना नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंवर टिकास्त्र सोडले. पंकजा मुंडे यांना खूप अहंकार आहे, त्यांनी तो सोडला पाहिजे, असे नामदेव शास्त्री म्हणाले. नामदेव शास्त्रींच्या या टिकेला पंकजांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात नव्याने रंगलेल्या या वादाची सध्या बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू झाला आहे. गोपीनाथ मुंडे हे हयात असताना भगवान गडावरील दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी ही परंपरा कायम ठेवली होती. परंतु काही दिवसांनी पंकजा मुंडेंनी परळीत गोपीनाथ गड उभारला. यामुद्यावरून पंकजा आणि नामदेव शास्त्री यांच्यात वादाची ठिणगी पडली.

भगवान गडावर दसरा मेळावा होणार नाही, अशी भूमिका नामदेव शास्त्रींनी घेतली आणि दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली. तेव्हापासून पंकजा मुंडे दरवर्षी गोपीनाथ गडावर दसरा मेळावा आयोजित करतात. तेव्हापासून या दोघात सुरू झालेला वाद अधूनमधून उफाळून येत असतो. अहमदनगर जिल्ह्यातील नारळी सप्ताहातही त्याचे प्रत्यंतर आले.

नामदेव शास्त्री म्हणालेः मी पंकजाला मुलगी मानले आहे. त्यामुळे मी तिच्या विरोधात कधीच जाणार नाही. मात्र तिच्या जवळचे चमचे हरामखोरपणा करतात. पंकजा मुंडे यांना खूप अहंकार आहे. त्यांनी त्यांचा अहंकार सोडला पाहिजे. पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांचेही आयुष्य खूप सुंदर आहे. मात्र तुम्ही एक लक्षात ठेवा की, तुम्ही कितीही मोठे झालात तरीही तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे, अहंकार नाही, असे नामदेव शास्त्री म्हणाले.

पंकजांचे प्रत्युत्तरः नामदेव शास्त्रींच्या या टिकेला पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून जशास तसे प्रत्युत्तर दिले. माझा जन्म स्त्रीच्या रुपात झाला आहे. मी जर जोरात बोलले तर तो अनेकांना अहंकार वाटतो. एखादा पुरूष जोरात बोलला तर त्याला वाघ म्हटले जाते. शंभर चुका करणाऱ्या पुरूषाला सुधारण्याची संधी मिळते. मला कुठलाही अहंकार नाही. मी फक्त गडाच्या पायथ्याची एक पायरी आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *