चंदिगडः क्रमिक पुस्तकांतून मुघलांचा इतिहास काढून टाकल्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली एनसीईआरटी आणखी एका वादात सापडली आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकात शीखांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीची माहिती देण्यात आली असल्याचा आरोप शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीने (एसजीपीसी) केला आहे. एनसीईआरटीकडून शीखांशी संबंधित ऐतिहासिक तत्थ चुकीच्या पद्धतीने सादर केले जात असल्याचा आरोप एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदरसिंग धामी यांनी केला आहे.
एनसीईआरटी सध्या मोठ्या वादात सापडलेली आहे. मुघलांचा इतिहास एनसीईआरटीच्या पुस्तकांतून काढून टाकण्यात आला आहे. त्यानंतर गांधी, हिंदू महासभा, नथुराम गोडसे आणि आरएसएसशी संबंधित प्रकरणे पुस्तकातून काढून टाकण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. त्यातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची माहिती एनसीईआरटीच्या पुस्तकात विपर्यस्तपणे सादर करण्यात आली. एनसीईआरटीची पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आरएसएसचे कोणतेही योगदान नव्हते, हे कळणारच नाही. शिवाय लाल किल्ला, ताजमहल वा अन्य ऐतिहासिक इमारती कोणाच्या काळात बांधल्या गेल्या याची माहितीच मिळणार नाही.
या पार्श्वभूमीवर एसजीपीसीने एनसीईआरटीच्या पुस्तकात शीखांबद्दलचा इतिहास पडताळून पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. एनसीईआरटीच्या इयत्ता १२ वीच्या ‘राजकीय विज्ञान’ या पुस्तकातील ‘स्वातंत्र्यानंतर भारताचे राजकारण’ या धड्यात आनंदपूर साहिब संकल्पाच्या बाबत भ्रामक माहिती दिली आहे. त्यामुळे शीख समुदायांच्या भावना दुखावल्या आहेत. श्री आनंदपूर साहिब ठरावाची व्याख्या करताना शीखांना फुटिरतावादी म्हणून चित्रित करण्यात आले आहे, ते उचित नाही. हा अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख एनसीईआरटीने काढून टाकावा, अशी मागणी धामी यांनी केली आहे.
“राज्यांचे हित आणि अधिकारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हिंदू राष्ट्राची भाषा बोलणाऱ्यांना जाणीवपूर्वक फायदा पोहोचवला जात आहे. अल्पसंख्यांकाचे मुद्दे सोडवण्याऐवजी चुकीच्या धारणा तयार करून त्यांच्या विरोधात एक नरेटिव्ह सेट केला जात आहे.”
-हरजिंदरसिंग धामी, शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष
सगळे बदल विद्यमान केंद्र सरकारच्या हिशेबाने केले जात आहेत. विशेषतः अल्पसंख्यांकांच्या संदर्भातील सर्व प्रकरणे काढून टाकण्यात येऊ लागली आहेत आणि मनमानी पद्धतीने अभ्यासक्रम तयार केले जात आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. याच क्रमात श्री आनंदपूर साहिब ठरावाची ‘स्वातंत्र्यानंतरचे भारतातील राजकारण’ या पुस्तकात चुकीची व्याख्या केली गेली आहे, असे हरजिंदरसिंग धामी यांनी म्हटले आहे.
श्री आनंदपूर साहिब ठराव हा एक ऐतिहासिक दस्तावेज असून त्यात चुकीचे असे काहीच नाही. हा ठराव राज्यांचे अधिकार आणि देशाच्या संघराज्यीय रचनेला मजबूत करण्याचा आग्रह धरतो आणि दुःखाची गोष्ट अशी की, आजही परिस्थिती तशीच आहे, असे धामी यांनी म्हटले आहे.