छत्रपती संभाजीनगरः छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात रात्री दोन वाजेच्या सुमारास दोन गटांत तुफान राडा झाला. या राड्यात पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार आणि अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर केला. किराडपुरा भागातील राम मंदिर परिसरात आधी दोन गटांतील तरूणांत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर राड्यात झाले. त्यानंतर हाणामारी, दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरूणांच्या दोन गटांत किरकोळ बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर तुफान राड्यात झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला वारंवार शांततेचे आवाहन करूनही जमाव काही शांत होत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी जास्तीची कुमक मागवली.
पोलिसांची जास्तीची कुमक येईपर्यंत जमावाने या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आधी अश्रूधुराच्या नळकांड्या नंतर हवेत गोळीबार करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही पोलिसांनी म्हटले आहे. शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनीही शांततेचे आवाहन केले आहे.
राम मंदिरातून खा. इम्तियाज जलील यांचे आवाहन
किराडपुरा भागातील ज्या राम मंदिराबाहेर हा राडा झाला, त्या राम मंदिरात छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील गेले. तेथून त्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. मी सध्या राम मंदिरात आहे. या मंदिरात कोणतीही गडबड झालेली नाही. मंदिराबाहेर थोडा गोंधळ झाला. जर कोणी चुकीच्या अफवा पसरवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. मंदिराबाहेर काही वाहनांचे नुकसान केले आहे. परंतु मंदिरात कोणतेही चुकीचे काम करण्यात आलेले नाही. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे खा. जलील यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
कोणाचीही हयगय करू नका- दानवेः मागील पंधरा दिवसांपासून एमआयएम आणि भाजप हे दोन्ही आपले राजकारण करण्यासाठी परिस्थिती खराब करू शकतात, अशी पोलिसांना माहिती दिली होती. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे कोणाचीही हयगय करू नये आणि दोषींना तातडीने पकडावे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
तणाव निवळला-फडणवीसः संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. खबरादारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजीनगरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तणाव निर्माण होईल, असे वर्तन कोणीही करू नये, सर्वांनी शांतता ठेवावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.