नांदेड/जालंधरः पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला खलिस्तान समर्थक नेता अमृपालसिंग खालसा हा नांदेडमध्ये आश्रयाला आला असण्याची शक्यता वर्तवली जात असून या संशयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस अलर्ट झाले आहेत. नांदेड पोलिसही अलर्ट मोडवर आले असून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने स्थानिक पातळीवर देखरेख वाढवली आहे. जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर आहे.
पंजाब पोलिसांनी गेल्या पाच-सहा दिवसांपासून वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तानी समर्थक प्रमुख नेता अमृतपालसिंग खालसा आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात अर्थसैनिक दलाच्या मदतीने अभियान सुरू केले आहे. तरीही तो फरार आहे. त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस आणि अजामिनपात्र वॉरंटही जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएची ८ पथकेही पंजाबमध्ये पोहोचली आहेत.
पोलिसांनी अमृतपालसिंगच्या ११४ साथीदारांना ताब्यात घेतले आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपालसिंगच्या जवळपास ५०० साथीदारांची ओळख पटवून त्यांची माहिती एनआयएला दिली आहे. या ५०० जणांच्या यादीत अमृतपालसिंगसोबत कायम राहणाऱ्या १४२ लोकांचाही समावेश आहे. इतर लोक संघटना आणि अर्थ सहाय्याचे कामकाज पहात होते.
अमृतपालसिंगच्या काही कुटुंबीयांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे काका हरजितसिंग याला रासुकाखाली अटक करून आसामला पाठवण्यात आले आहे. अमृतपालसिंगचे गाव सध्या पोलिस छावणी बनले आहे.
काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी जालंधरमध्ये त्याचा काही किलोमीटर पाठलाग केला होता. मात्र अमृतपालसिंग पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात यशस्वी झाला आहे. तेव्हापासून त्याला फरार घोषित करण्यात आले असून त्याचा शोध घेण्यासाठी पंजाब पोलिस, अर्धसैनिक दल आणि एनआयएने जंग जंग पछाडले आहे.
पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी अमृतपालसिंगला शोधून काढण्यासाठी लूकआऊट नोटीस बजावल्यानंतर महाराष्ट्र पोलिसही सतर्क झाले असून नांदेड आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये देखरेख वाढवण्यात आली आहे.
पंजाबमधून फरार झालेला अमृतपालसिंग थेट नांदेडमध्ये आश्रयाला आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी नांदेड जिल्ह्यात तपास वाढवला आहे. जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यावर लोकांवर बारीक नजर ठेवली जात आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानेही स्थानिक पातळीवर देखरेख वाढवली असून संशयितावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
वेगवेगळ्या ७ लूकमध्ये फिरतो अमृतपालसिंग
फरार खलिस्तान समर्थक नेता अमृतपालसिंग हा वेगवेगळ्या सात लूकमध्ये वावरतो. पंजाब पोलिसांनी त्याचे सात वेगवेगळे लूक जारी केले आहे. आताही अमृतपालसिंगने आपली वेशभूषा आणि लूक बदलला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंजाबबाहेरच्या पोलिसांना अमृतपालसिंगला ओळखणे आणि त्याचा शोध घेणे अवघड काम बनले आहे.
पाकिस्तानी आयएसआय, ड्रग्ज माफियाशी संबंध
पंजाब पोलिसांच्या मते, अमृतपालसिंग कुख्यात पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. त्याचे संबंध ड्रग्ज माफियाशी होते. तेथूनच त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत होती. ड्रग्ज माफियाच्या एका कुख्यात प्रमुखानेच त्याला मर्सिडीज गाडी भेट दिली होती. पाकिस्तानी आयएसआयकडून अमृतपालसिंगला गोळाबारूद पुरवण्यात येत होती. ज्या गाडीतून अमृतपालसिंग पळाला, ती गाडी ड्रग माफिया रावेलसिंगची होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पत्नी किरणदीपचीही चौकशी
पंजाब पोलिस सध्या अमृतपालसिंगची आई आणि पत्नी किरणदीपची चौकशी करत आहेत. किरणदीप ब्रिटनमध्ये राहणारी अनिवासी भारतीय आहे. ती बब्बर खालसा इंटरनॅशनलची सदस्यही आहे. खलिस्तान समर्थक संघटनेच्या समर्थनार्थ पैसे गोळा केल्याच्या आरोपाखाली कथितरित्या किरणदीपला २०२० मध्ये पोलिसांनी उचलले होते.