मुंबई: केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी ‘प्रसाद’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य धनंजय मुंडे यांनी परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी केंद्रीय पर्यटन विभागाच्या ‘प्रसाद’ योजनेत समावेश केला जावा, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पर्यटन संचालनालयामार्फत बीडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवण्यात आला आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडू प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ‘प्रसाद’ योजनेमधील तरतुदी निकषानुसार तपासून उचित कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, असेही लोढा यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुभाष देशमुख यांनी सहभाग घेतला.