उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत नेते सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश!


मुंबईः  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

मला एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आवडते. मी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय खूप आधीच घेतला होता आणि त्याची माहिती वडिलांना दिली होती, असे भूषण देसाई यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. या आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक नेतेही शिवसेना सोडून शिंदेसोबत गेले आहेत. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ठाकरे घराण्याशी निष्ठावंत असलेले नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाईही शिंदे गटात सामील झाल्यामुळे हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुभाष देसाई उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. सिंधूदुर्ग येथे नुकत्याच झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे देसाई म्हणाले होते. आता थेट त्यांचाच मुलगा शिंदे गटात गेला आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर काही जुनी खोडं उद्धव ठाकरेंसोबतच राहिली आहेत, त्यात लिलाधर डाके, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई इत्यादींचा समावेश आहे. मात्र या जुन्या खोडांची पुढची पिढी मात्र वेगळा मार्ग अवलंबताना दिसत आहे.

शिंदे गटाच्या बाळासाहेब भवन येथे भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सुभाष देसाई यांचे केडर हे आता भूषण देसाई यांच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर आता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कुटुंबातील सदस्यांवबर शिंदे गटाची नजर असल्याची माहिती समोर येत आहे.

भूषण आणि शिवसेनेचा संबंध नाही: आदित्य ठाकरे

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ज्यांना कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचे आहे, त्यांनी जरूर जावे. सुभाष देसाई ह आमच्या सोबत आहेत. चोवीस तास ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत असतात. ते आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. भूषण देसाई आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. त्यांना जिथे कुठे जायचे आहे, त्यांनी जावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वडिलांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न:भूषण

आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर भूषण देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरेंनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केले, त्यावर मी काय बोलणार? मी खूप लहान आहे. तुम्ही जर माहिती घेतली तर माझा शिवसेनेशी संबंध आहे की नाही, हे तुम्हाला समजेल. माझ्या वडिलांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी काय करायचे ते मी ठरवले होते. ठाकरेंची शिवसेना आणि ही शिवसेना यांच्यात काय फरक आहे, ते मला समजले म्हणूनच मी एकनाथ शिंदेसोबत आलो. मला हे वॉशिंग मशीन वाटत नाही. मी विकासाचे काम करणाऱ्यांसोबत आलो आहे, असे भूषण देसाई म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *