विद्यापीठाच्या राजकारणात प्रथमच ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’, ‘उत्कर्ष’चे २५ आणि ‘विकास मंच’चे २० अधिसभा सदस्य कालपासून रिसॉर्टवर!


औरंगाबादः विधानसभा, महानगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांनंतर सदस्यांची पळवापळवी आणि फाटाफूट टाळण्यासाठी होणारे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’  महाराष्ट्राला नवे नाही. आता हे लोन उच्च शिक्षण क्षेत्रात पसरले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राजकारणात पहिल्यांदाच ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ अवतरले आहे. व्यवस्थापन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आ. सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वातील उत्कर्ष पॅनेलचे २५ आणि भाजपृ आरएसएस प्रणीत एबीव्हीपीचे गजानन सानप यांच्या नेतृत्वातील विद्यापीठ विकास मंचचे २० अधिसभा सदस्य काल रात्रीपासूनच दोन वेगवेगळ्या रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आज निवडणूक होत आहे. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वातील उत्कर्ष पॅनलसाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गजानन सानप हे राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून व्यवस्थापन परिषदेवर आल्यामुळे चुरशीची बनली आहे.

सानप यांनी जोरदार फिल्डिंग लावल्यामुळे या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आपल्या गटातील सदस्य दुसऱ्या गटाच्या गळाला लागू नये म्हणून उत्कर्ष आणि विद्यापीठ विकास मंच या दोन्ही पॅनल्सनी खबरदारी घेतली असून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून ४० आमदार गुवाहटीला नेले तसेच दोन्ही पॅनल्सच्या सदस्यांना काल रात्रीपासूनच ‘स्थानिक गुवाहटी’ला नेऊन ठेवण्यात आले आहे.

अपडेट आवश्य वाचाः विद्यापीठाच्या राजकारणातही ‘५० खोके’चा गुवाहटी पॅटर्नः एका-एका मतासाठी वाटले ५० हजार रुपये, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले पण…

आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलचे २५ अधिसभा सदस्य दौलताबाद रोडवरील हिरण्य रिसॉर्टच्या शेजारील रिसॉर्टवर तर गजानन सानप यांच्या नेतृत्वातील २० अधिसभा सदस्य भाजप नेत्या अनुराधा चव्हाण यांच्या फुलंब्री तालुक्यातील ‘ऑरेंज पॅलेस’ रिसॉर्टवर काल रात्रीपासूनच हलवण्यात आले असून तेथे त्यांची मौजमजा सुरू आहे. हे सदस्य गटागटाने आज ११ वाजता विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात येण्याची शक्यता आहे.

का वाढली चुरस?:  विद्यापीठ विकास मंचचे ६ अधिसभा सदस्य निवडून आले आहेत. नंतर दोन अधिसभा सदस्य त्यांना जाऊन मिळाले आहेत. राज्यपाल नामनिर्देशित ९ अधिसभा सदस्य हे भाजप-आरएसएसशीच संबंधित आहेत कुलगुरूंनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांपैकी ३ अधिसभा सदस्य हेही भाजप-आसएसएसशीच संबंधित आहेत. राज्यपाल नामनिर्देशित विधानसभा सदस्यही भाजप-आरएसएसशीच संबंधित आहेत.

कोणाकडे किती मते?: सद्यस्थितीत उत्कर्ष पॅनलकडे ३० अधिसभा सदस्य आहेत तर विद्यापीठ विकास मंचकडे २१ अधिसभा सदस्य आहेत. विद्यापीठात एक्स ऑफिशिओ मेंबर  म्हणजेच पदसिद्ध सदस्यांची १८ मते आहेत. ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’  या म्हणीप्रमाणे हे पदसिद्ध सदस्य ज्यांची सत्ता त्यांच्या बाजूने कौल देत आलेले आहेत. त्यातच राज्याच्या प्रत्येक विद्यापीठाच्या निवडणुकीत भाजप विशेष काळजी घेत असून राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर हे स्वतः मतदानाला हजर राहून मतदान करत आहेत. यावेळी मात्र त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला आहे.

पाडळकरांमुळे आरएसएसमध्ये होती नाराजीः आधी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर डॉ. नीता पाडळकर यांच नामनिर्देशन केले होते. त्यामुळे भाजप-आरएसएसच्या गोटात नाराजी होती. परिणामी राज्यपालांनी नामनिर्देशित केलेले अन्य ९ सदस्य विद्यापीठात फिरकलेही नव्हते. त्यांनी त्यांचे प्रश्नही प्रतिनिधीमार्फत पाठवले होते. परंतु गजानन सानप यांचे नामनिर्देशन झाल्यामुळे हे सदस्य सक्रीय झाले आहेत आणि त्यामुळेच या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे पाडळकर यांचे नामनिर्देशन रद्द केले किंवा कसे? याचा खुलासा राजभवनाकडून अद्यापही झालेला नाही.

७१ पैकी पहिल्यांदाच ३२ नवे चेहरेः विद्यापीठ अधिसभेच्या एकूण ७१ सदस्यांपैकी पहिल्यांदाच तब्बल ३२ नवीन चेहरे अधिसभा सभागृहात आलेले आहेत. विद्यापीठाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने नवीन चेहरे अधिसभेवर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नवीन चेहऱ्यांना विद्यापीठ राजकारणातील खाचखळगे फारसे माहिती नसल्यामुळे त्यांना कोणीही सहज गळाला लावू शकतो, असा धोका दोन्ही गटांना वाटू लागल्यामुळेच ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा आश्रय घेण्यात आला आहे.

कुलगुरूंची भूमिका ठरणार निर्णायकः विद्यापीठ अधिसभेचे एकूण ७१ सदस्य आहेत. त्यापैकी कुलपती तथा राज्यपाल हे या मतदानासाठी गैरहजर राहणार आहेत. तर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले या निवडणुकीत मतदान करणार की तटस्थ राहणार? हेही महत्वाचे ठरणा आहे. ते तटस्थ राहिले तर ६९ सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत एक एक पसंती महत्वाची ठरणार असून कुलगुरूंनी जर मतदान प्रक्रियेत भाग घेतला तर त्यांचे मत निर्णायक ठरू शकते.

असा असेल कार्यक्रमः सकाळी ११ वाजता म. फुले सभागृहात अधिसभा बैठकीला प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत सभागृहाचे इतर कामकाज केले जाईल. दुपारी १२ ते २ या वेळेत मतदान घेतले जाईल आणि लंच ब्रेकनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

विद्यापरिषद, स्थायी समिती सदस्य निवडणारः

  • अधिसभेतून विविध अधिकार मंडळावर निवडून येणाऱ्या सहा सदस्यांची निवड याच बैठकीत होणार आहे. विद्या परिषदेवर संस्थाचालकांमधून एक सदस्य निवडण्यात येईल.
  • प्राचार्य, प्राध्यापक व पदवीधर या गटातून प्रत्येकी एक सदस्य स्थायी समितीवर निवडून जाणार आहे.
  • मागास प्रवर्गातील एक अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे दोन सदस्य तक्रार निवारण समितीवर निवडले जाणार आहेत.
  • अधिसभेतून ८ सदस्य व्यवस्थापन परिषदेवर निवडून जाणार आहेत. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, पदवीधर व संस्थाचालक गटातून प्रत्येकी दोन जागा आहेत. यातील राखीव प्रवर्गातील चारही जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवार आहे.

चार जागांसाठी ९ उमेदवारः अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून येणाऱ्या खुल्या गटातील चारही जागांसाठी निवडणूक होणार आहे. शिक्षक प्रवर्गात डॉ.शंकर अंभोरे, डॉ.अंकुश कदम व डॉ भगवानसिंग ढोबाळ हे तीन उमेदवार आहेत. संस्थाचालकातून गोविंद देशमुख व बस्वराज मंगरुळे तर पदवीधर गटातून ल व प्रा.सुनील मगरे व योगिता होके पाटील हे उमेदवार आहेत. प्राचार्य गटातून डॉ.विश्वास कंधारे व डॉ.भारत खंदारे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

राखीव गटातून प्रत्येकी एकच अर्ज: अधिसभेच्या राखीव गटातून डॉ.गौतम पाटील (प्राचार्य), दत्तात्रय भांगे (पदवीधर), डॉ.रविकिरण सावंत (प्राध्यापक) व नितीन जाधव (संस्थाचालक) यांचे प्रत्येकी एकच अर्ज असल्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे अधिसभेच्या बैठकीत त्यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!