मुंबईः फेब्रुवारीपासूनच उन्हाचा कडाका वाढलेला असताना मार्च महिना लागताच हवामानात काहीसा बदल झालेला अनुभवायला मिळतो आहे. अशातच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चार ते आठ मार्चदरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती त्याचबरोबर अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे परंतु उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे.
या मिलाफामुळे चार ते आठ मार्चपर्यंत वातावरण ढगाळ राहील तसेच तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर कोकण या भागावर परिणाम होण्याचा अंदाज आहे.
शनिवारी आणि रविवारी नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
रविवार आणि सोमवारी मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातही हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह हलक्या वापसाची शक्यता आहे.
या अवकाळी पावसामुळे गहू- हरभऱ्याबरोबरच रब्बीची पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बहुतांश भागात द्राक्ष काढणीला आलेले आहेत. आंब्याच्या बागाही लगडलेल्या आहेत. अशात अवकाळी पाऊस झाल्यास रब्बीच्या पिकांबरोबरच फळबागांची मोठी नासाडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.