नवी दिल्लीः महागाईमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना मोदी सरकारने होळीच्या आधीच महागाईचे गिफ्ट दिले आहे. गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करून तेल कंपन्यांनी जबर दणका दिला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या भाववाढीमुळे दिल्लीत गॅस सिलिंडर आता ११०३ रुपयांना मिळणार आहे. व्यावयासिक वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची केलेली ५० रुपयांची दरवाढ १ मार्चपासून लागू होणार आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढवण्यात आल्या आहेत. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
घरगुती सिलिंडरचे असे असतील नवे दरः घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केल्यामुळे मुंबईत हे सिलिंडर १०५२ रुपयांऐवजी ११०२ रुपयांना, दिल्लीत १०५३ रुपयांऐवजी ११०३ रुपयांना, कोलकोत्यात १०७१ रुपयांऐवजी ११२९ रुपयांना आणि चेन्नईमध्ये १०६८.५० रुपयांऐवजी १११८.५० रुपयांना मिळणार आहे.
व्यावसायिक सिलिंडरचे दर असेः व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती ३५० रुपयांनी वाढवल्यामुळे दिल्लीत हे सिलिंडर आता १७६९ रुपयांऐवजी २११९.५० रुपयांना, कोलकात्यात १८७० रुपयांऐवजी २२२१.५० रुपयांना, मुंबईत १७२१ रुपयांऐवजी २०७१.५० रुपयांना तर चेन्नईत १९१७ रुपयांऐवजी २२६८ रुपयांना मिळणार आहे.
काँग्रेसचे टिकास्त्रः गॅस सिलिंडरच्या भाववाढीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढवल्या. व्यावसायिक गॅस सिलिंडर ३५० रुपयांनी महाग केला. आता होळीचे पक्वान कसे बनतील? लुटीचे हे फर्मान कुठपर्यंत चालू राहणार?, असे जनता विचारत आहे. मोदी सरकारने लागू केलेल्या कंबरतोड महागाईमुळे माणूस भरडून निघत आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी म्हटले आहे.