बागेश्वर: कथित चमत्काराचे दावे करून चर्चेत आलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी दररोज मारहाण करायची, असे वक्तव्य धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केले असून त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी त्यांच्या बागेश्वर धाममध्ये प्रवचनादरम्यान कथित चमत्काराचे दावे केले होते. त्यांच्या चमत्काराच्या दाव्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते. त्यांच्या चमत्काराचा वाद सुरू असतानाच त्यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल हे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. ‘संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करायची. याच कारणामुळे एका व्यक्तीने त्यांना विचारले की, तुम्ही पत्नीकडून रोज मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का?, असे धीरेंद्र कृष्ण म्हणताना दिसत आहे.
धीरेंद्र कृष्ण महाराज पुढे सांगताना दिसतात की, ‘या प्रश्नाचे उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिले. ते म्हणाले की, देवाची कृषा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे. त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते’, असे धीरेंद्र कृष्ण महाराज या व्हायरल व्हिडीओत सांगताना दिसत आहेत.
धीरेंद्र कृष्णाविरुद्ध महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रियाः धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केलेले वक्तव्य फक्त संत तुकाराम महाराजांचाच नव्हे तर सबंध महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे धीरेंद्र महाराजांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणीही केली जात आहे.
देहू संस्थानचे विश्वस्त म्हणाले, आम्ही तुम्हाला माफ करतोः धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या वक्तव्यावर देहू संस्थानच्या विश्वस्तांनी प्रतिक्रिया दिली आहे. बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो.क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. संतांवर चुकीचे वक्तव्ये करू नये. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. संतांवर कोणी काही बोलू नये म्हणून यावर कायदा बनवावा, म्हणजे अशा गोष्टींना पायबंद बसेल, असे देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहे.
तुकोबांना घास भरवल्याशिवाय जिजाबाई अन्न,पाणी घेत नव्हत्या. डोंगराच्या ठिकाणी नामस्मरणात असलेल्या तुकोबांना त्या भाकरी खाऊ घालून यायच्या. पतीव्रता त्यागाची त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे वक्तव्य करू नये. आगोदर सविस्तर माहिती घ्यावी. मगच बोलावे. वाकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. बंबाजी, रामेश्वर भट्ट यांना माफ करणारा आहे, असेही माणिक महाराज मोरे म्हणाले.
तुका म्हणे ऐशा नरा….आ. रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रियाः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. ‘बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल, पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेले महाराष्ट कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावे. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!’, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.