नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीने तयार केलेली ‘इंडियाः द मोदी क्वेशन’ या डॉक्यूमेंट्रीचे विशेष स्क्रीनिंग करण्याचा प्रयत्न जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयूमध्ये मंगळवारी रात्री झाला. परंतु विद्यापीठ प्रशासनाने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विद्यापीठ परिसरातील वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, एनएसयूआयने देशभरातील विद्यापीठात या डॉक्यूमेंट्रीचे स्क्रीनिंग करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या डॉक्यूमेंट्रीचा वाद आता चांगलाच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जेएनयू छात्र संघाने (JNUSU) मंगळवारी रात्री ९ वाजता ‘इंडियाः द मोदी क्वेशन’ या बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. विद्यापीठ परिसरात या डॉक्यूमेंट्रीचे स्क्रीनिंग करू नये, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले होते. या डॉक्यूमेंट्रीचे स्कीनिंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही विद्यापीठ प्रशासनाने दिला होता. परंतु प्रशासनाने मनाई करूनही जेएनयूएसयू या डॉक्यूमेंट्रीचे स्क्रीनिंग करू इच्छित होता.
या डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रिनिंगमुळे विद्यापीठाच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही. या डॉक्यूमेंट्रीचे स्क्रिनिंग करण्यामागे कोणताही अनुचित प्रकार घडवण्याचा आमचा उद्देश नाही. केवळ डॉक्यूमेंट्री पाहणे हाच आमचा उद्देश आहे. ही डॉक्यूमेंट्री पाहणे ऐच्छिक असून ज्या विद्यार्थ्यांना ती पहायची आहे, तेच येतील, असे जेएनयूएसयूने जोर देऊन म्हटले होते.
मनाई करूनही जेएनयूएसयू या डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रिनिंगवर ठाम असल्याचे पाहून विद्यापीठ प्रशासनाने या डॉक्यूमेंट्रीच्या प्रदर्शनाआधीच म्हणजे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता विद्यापीठ परिसरातील वीज पुरवठा खंडित केला. वीज गुल झाल्यानंतर निषेध म्हणून जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी जेएनयूएससू कार्यालयाजवळ मोबाइल, लॅपटॉपसारख्या वैयक्तिक उपकरणांवर या डॉक्यूमेंट्रीचे स्ट्रीमिंग केले. यावेळी विद्यापीठ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
‘काश्मीर फाईल्स’ का थांबवण्यात आला नाही?: विद्यापीठ प्रशासनाच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जेएनयू कॅम्पसमध्ये ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले, तेव्हा ते थांबवण्यात आले नाही, मग ‘इंडियाः द मोदी क्वेशन’ या डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रीनिंगलाच विरोध का? असा सवाल या संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे. पहाटे उशिरापर्यंत हे विद्यार्थ्यी जेएनयू प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करत होते.
हैदराबाद विद्यापीठात झाले स्क्रीनिंगः जेएनयूच्या आधी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात ‘इंडियः द मोदी क्वेशन’ या बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीचे स्क्रीनिंग करण्यात आले. सोमवारी रात्री स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन आणि मुस्लिम स्टुडंड फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी हे स्क्रीनिंग केले होते. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडे एबीव्हीपीने तक्रार केली आहे.
सरकार-विरोधकांत तणावः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तयार करण्यात आलेल्या या बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून केंद्र सरकार आणि विरोधकांत ताणाताणी सुरू आहे. विरोधी पक्ष बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीची लिंक ट्विटवर शेअर करत आहेत. विशेष म्हणजे मोदी सरकारने ट्विटर आणि यूट्यूबवरून ही डॉक्यूमेंट्री हटवण्याचे फर्मान जारी केले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहे. ही मोदी सरकारची सेन्सॉरशिप असल्याचे सांगत त्याचा निषेध म्हणून ते या डॉक्यूमेंट्रीच्या लिंक्स शेअर करत आहेत.
एनएसयूआय करणार देशभरातील विद्यापीठांत स्क्रीनिंग
जेएनयूमध्ये ‘इंडियाः द मोदी क्वेशन’ या बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीचे स्क्रिनिंग हाणून पाडण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाने केल्यानंतर काँग्रेसची विद्यार्थी आघाडी असलेल्या एनएसयूआयने देशभरातील विद्यापीठांमध्ये या डॉक्यूमेंट्रीचे स्क्रीनिंग करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. ‘सूर्य-चंद्र आणि सत्य फार काळ झाकले जाऊ शकत नाही. जर बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातली जाऊ शकते तर भारतीय मीडियाशी सरकार काय करत असेल, याचा विचार करा. एनएसयूआय देशातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये ही डॉक्यूमेंट्री दाखवणार आहे,’ असे एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी म्हटले आहे.