मुंबईः उत्तर भारतात होणार असलेल्या पश्चिमी प्रकोपामुळे महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात थंडीनेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गारठा वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपामुळे महाराष्ट्रात २३ ते २७ डिसेंबरदरम्यान थंडीमध्ये काहीशी वाढ झाली होती. उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. या वातावरणामुळे महाराष्ट्रातील थंडी काहीशी कमी झाली आहे.
नव्या वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२३ पासून उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी प्रकोप होण्याची शक्यता आहे. तिकडे होणाऱ्या हिमवर्षावामुळे महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात एरवी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस असणारी थंडी यंदा जाणवत नाही. किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी अधिक आहे. परंतु उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपामुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या थंडीची तीव्रता फारशी नसेल मात्र सध्याच्या तापमानात घसरण होऊन पुन्हा एकदा थंडीची जाणीव व्हायला लागेल, असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.