औरंगाबाद: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून ११ ते १५ जानेवारी २०२३ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत होणार आहे.
नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र औरंगाबाद प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा-वेरूळ (औरंगाबाद) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या महोत्सवाला मिळालेले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी, अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अॅकॅडमिक पार्टनर आहेत.
आयोजनामागील उद्देशः आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट औरंगाबादच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व औरंगाबादचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रॉडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, औरंगाबाद शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
भारतीय चित्रपट स्पर्धाः महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत.
यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे सुवर्ण कैलास पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.
फ्रिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फ्रिप्रेसी हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि अजिंठा वेरूळ (औरंगाबाद) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फ्रिप्रेसीने अजिंठा वेरूळ (औरंगाबाद) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता) इतर चित्रपटांकरिता विशेष परीक्षण करणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी, ११ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता होणार असून यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ, समीक्षक आदींची उपस्थिती असणार आहे. या महोत्सवाचा समारोप रविवार, १५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असून याच सोहळ्यात विजेत्या चित्रपटाला सुवर्ण कैलास सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्कार देऊन गौरवले जाईल तर चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल एका मान्यवराला पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर समारोपाचा सिनेमा दाखवण्यात येईल.
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनाबरोबरच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. यात मास्टर क्लास, परिसंवाद, चर्चासत्र व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या खेळानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.
महोत्सवात मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या शॉर्ट फिल्म या ज्युरी कमिटीने निवडलेल्या शॉर्टफिल्म महोत्सवादरम्यान दाखवण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला २५,००० रुपयांचे रोख पारितोषिक व सिल्व्हर कैलासा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
फिल्म फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता औरंगाबाद शहरात २० डिसेंबर २०२२ ते १० जानेवारी २०२३ दरम्यान पंचवीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन प्रसिद्ध चित्रपट समीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे.
औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ.गिरीश गाडेकर, डॉ.रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, डॉ.मुस्तजीब खान, मंगेश मर्ढेकर, सुबोध जाधव आदींनी केले आहे.