औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच अवघ्या दहा-पंधरा फुटाच्या अंतरावर बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रवेशद्वाराचा वाद चिघळलेला असतानाच आज आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर आंबेडकरी चळवळीच्या आक्रमकतेसमोर नमते घेत नवीन गेटचे झालेले बांधकाम तीन दिवसात जमीनदोस्त करण्यात येईल, असा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केला. विद्यापीठ प्रशासनाने तीन दिवसात हे बांधकाम पाडले नाही तर आम्ही बुलडोजर लावून आम्हीच हे बांधकाम जमीनदोस्त करू, असा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच अगदी दहा-पंधरा फुटांच्या अंतरावर ‘इन-आऊट गेट’च्या नावाखाली नवीन गेट बांधण्यात येत आहे.
विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार हे नामांतर चळवळीचे प्रतिक तसेच आंबेडकरी जनतेची अस्मिता आणि प्रेरणास्रोत बनले आहे. त्यामुळे या मुख्य प्रवेशद्वाराचे महत्व कमी करण्यासाठीच विद्यापीठ प्रशासनाकडून नवीन प्रवेशद्वार बांधण्यात येत आहे, असा आंबेडकरी नेते आणि कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. आंबेडकरी जनतेच्या भावना आणि हे सर्व आक्षेप धुडकावून विद्यापीठ प्रशासन या नवीन गेटचे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होते.
विशेष म्हणजे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आंबेडकरी नेत्यांनी यापूर्वीच या नवीन प्रवेशद्वाराच्या बांधकामाला विरोध केला आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली नवीन गेट बांधण्याचे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन दिला होता.
आंबेडकरी जनतेची इच्छा नसेल तर नवीन गेट बांधणार नाही, असे आश्वासन कुलगुरूंनी या शिष्टमंडळाला दिलेही होते. त्यानंतर कंत्राटदाराच्या ‘मगर’मिठीत गेलेल्या काही जणांनी या गेटचे काम सुरू ठेवा, असे निवेदन कुलगुरूंना दिले होते. त्यामुळे बंद केलेले या गेटचे काम पुन्हा सुरू झाल्यामुळे आंबेडकरी जनतेत असंतोष निर्माण झाला होता.
त्यातच आंबेडकरी चळवळीतील तरूण नेत्यांनी १ डिसेंबर रोजी या नवीन गेटच्या विरोधात पुन्हा आंदोलन करून हे प्रतिगेट होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावेळी कुलगुरू डॉ. येवले हे बाहेर गावी असल्यामुळे या शिष्टमंडळाशी त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आज त्यांनी या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. विद्यापीठाच्या मुख्य गेटचे काय सुशोभीकरण करायचे ते करा, परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली नवीन गेट बांधून मुख्य गेट अडगळीत टाकण्याचे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका या शिष्टमंडळातील आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतली.
नवीन गेटच्या आडून आंबेडकरी चळवळीत फूट पाडण्याचा प्रयत्नः ज्येष्ठ नेत्यांनी विरोध दर्शवल्यानंतर या गेटचे बांधकाम करणार नाही, असे आश्वासन तुम्ही दिले. नंतर बगलबच्चांना हाताशी धरून या गेटला आंबेडकरी चळवळीचा पाठिंबा असल्याचे दर्शवून तुम्ही गेटचे काम पुढे रेटले. या नवीन गेटच्या आडून तुम्ही आंबेडकरी चळवळीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, असा थेट आरोपच शिष्टमंडळातील नेते आणि कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. येवले यांच्यावर केला. कुलगुरूंशी चर्चा करताना शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी काही जणांची नावे घेत हे तुमचे दलाल आहेत, त्या दलालांना हाताशी धरून तुम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, असा आरोप केला. त्यात एका पत्रकाराचेही नाव घेण्यात आले. शिष्टमंडळातील नेत्यांनी उपस्थित केलेले तांत्रिक मुद्दे आणि कार्यकर्त्यांनी झाडलेल्या आरोपांच्या फैरीमुळे कुलगुरू चांगलेच बॅकफूट गेल्याचे यावेळी पहायला मिळाले.
नेते आणि कार्यकर्त्यांची भूमिका ठामः या नवीन गेटचे अर्धेअधिक बांधकाम झाले आहे. ते तुम्ही पाडणार नसाल तर आम्ही बुलडोजर लावून पाडून टाकू, अशी अटीतटीची भूमिका या शिष्टमंडळातील नेते आणि कार्यकर्त्यांनी कुलगुरूंसमोर मांडली. नवीन गेट होऊ देणार नाही, या भूमिकेवर आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते आपल्या भूमिकेवरून तसूभरही हटत नाहीत, हे पाहून कुलगुरू डॉ. येवलेंनी अखेर नमते घेतले आणि तीन दिवसांत नवीन गेट जमीनदोस्त करू, असा निर्णय कुलगुरू डॉ. येवले यांनी जाहीर केला. तीन दिवसांत हे बांधकाम पाडले नाही तर आम्ही बुलडोजर लावून ते पाडून टाकू, असा इशारा यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने कुलगुरूंना देण्यात आला. कुलगुरूंनी घेतलेला निर्णय आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगत आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
या शिष्टमंडळात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिनकरदादा ओंकार, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या सूर्यकांता गाडे, निवृत्त अधिकारी दौलतराव मोरे, सिद्धांत गाडे, राजू साबळे, अरूण शिरसाठ, विजय वाहुळ, प्रकाश इंगळे, अनिल मगरे, सर्जेराव मनोरे, दीपक निकाळजे, सचिन भुईगळ, सोनू नरवडे, डॉ. सचिन बोर्डे, सय्यद तौफिक, नागेश जावळे, विजय हिवराळे, नरेश वरठे, कपिल बनकर, विजय शिंदे, कुणाल खरात, सुरेश शिनगारे, स्वप्निल शिरसाठ, रणजित साळवे, राहुल साळवे, अमित वाहुळ यांच्यासह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.