मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा, यंदा आठ दिवस आधीच होणार नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन!


मुंबईः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. एकीकडे सबंध महाराष्ट्र उन्हाच्या काहिलीने घामाघूम झालेला असतानाच दुसरीकडे काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा आठ दिवस आधीच भारताच्या आंदमान आणि निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.

दक्षिण तेलंगणा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून रायलसीमा, तामिळनाडू ते मानारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग घोंगावू लागले आहेत. पुढील पाच दिवस काही भागात विजांचा गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटासह  वादळी वारा आणि अवकाळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला.

७ मे बुधवारः आज पालघर,ठाणे, जळगाव, नाशिक, नाशिकचे घाट, अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे,पुण्याचे घाट, सातारा, सातारचे घाट, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. या भागात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, कोल्हापूरचे घाट, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती,  बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

८ मे, गुरूवारः  पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी,धुळे,  नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिकचे घाट, अहिल्यानगर(अहमदनगर), सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशमि आणि यवतमाळमध्ये हवामान ढगाळ राहील आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

९ मे, शुक्रवारः नंदूरबार जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

१० मे, शनिवारः नाशिकचे घाट, पुण्याचे घाट, कोल्हापूरचे घाट, सातारा घाट परिरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा,  वादळे आणि हलका ते  मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिसरात वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

११ मे, रविवारः नाशिक, नाशिकचे घाट, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट या  भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते  मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

आठ दिवस आधीच येणार नैऋत्य मोसमी पाऊस

नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे यावर्षी मोसमी पाऊस आठ दिवस आधीच दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी २२ मे रोजी मोसमी पाऊस अंदमानमध्ये दाखल होतो. यावर्षी १३ मे रोजीच नैऋत्य मोसमी पाऊस मलेशिया, सिंगापूर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील बाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!