TAIT 2025: डीएड/बीएडच्या शेवटच्या सेमिस्टरच्या उमेदवारांनाही आता देता येणार परीक्षा, राज्य सरकारने काढला सुधारित जीआर


मुंबईः महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीच्या (TAIT) नियमात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मोठा बदल केल्यामुळे डी.एड. आणि बी.एड. या व्यावयासिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता डी.एड. व बी.एड. च्या शेवटच्या सत्रात प्रवेश असणारे किंवा शेवटच्या सत्राच्या (सेमिस्टर) परीक्षेला बसलेले उमेदवारही टीएआयटी परीक्षा देऊ शकतील. नियमातील दुरूस्तीचे शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी (२ मे० रोजी जारी केले आहे.

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी देण्यासाठी उमेदवाराने किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य करणारा शासन निर्णय १० नोव्हेंबर २०२२ रोजी काढण्यात आला होता. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीस बसू देण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.

महाराष्ट्रात शिक्षक भरतीसाठीची पहिली टेट परीक्षा २०१७ मध्ये आणि दुसरी टेट परीक्षा २०२२ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर आता थेट २०२५ मध्ये ही परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या टेट परीक्षेत जवळपास ५ वर्षांचे अंतर आहे तर दुसऱ्या व तिसऱ्या टेट परीक्षेत जवळपास ३ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतरही अनेक उमेदवारांना टीएआयटी परीक्षेला बसण्यासाठी कालावधी लागत असल्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या म्हणजेच डी.एड. किंवा बी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही टीएआयटी परीक्षेला बसण्याची परवानगी द्या, अशी आग्रही मागणी वारंवार करण्यात येत होती.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या दोन्ही आयोगाकडून पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते, मग टीएआयटी परीक्षेला बसण्याची संधी का देण्यात येत नाही? असा ही मागणी करणाऱ्या उमेदवारांचा सवाल होता. एमपीएससी व यूपीएससीचा दाखला देत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे उशिरा का होईना पण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ध्यानात आले आणि मग २ मे रोजी आधीच्या शासन निर्णयात दुरूस्तीचे शुद्धीपत्रक जारी करून ही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय म्हटलेय शुद्धीपत्रकात?

१० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक ०३(२) मध्ये ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल’ असे नमूद करण्यात आले होते. या तरतुदीऐवजी आता ‘शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी करिता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रवेश असलेले अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवारदेखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील’, अशी दुरूस्ती या शासन निर्णयात करण्यात आल्यामुळे डी.एड./बी.एड.च्या अंतिम सत्राला शिकत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

…तर शिक्षक भरतीसाठी ठरणार अपात्र

डी.एड./बी.एड. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राच्या उमेदवारांना टेट परीक्षेला बसण्याची परवानगी देतानाच याच शुद्धीपत्रकात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काही अटीही घातल्या आहेत. त्या अशाः

  •  डी.एड./बी.एड.च्या शेवटच्या सत्राच्या उमेदवारांना टीएआयटी परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्यांचे टीएआयटी परीक्षेचे गुण जाहीर केले जाणार नाहीत. म्हणजेच त्यांचा निकाल राखून ठेवला जाईल. त्यांना डी.एड./बी.एड. ही व्यावसायिक अर्हता त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून जास्तीत जास्त १ महिन्याच्या कालावधीत सादर करावे लागेल.
  • अशा उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत म्हणजे व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्यांचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • जे उमेदवार एक महिने मुदतीच्या कालावधीत व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण केल्याचे गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र सादर करतील अशा उमेदवारांचेच टीएआयटी परीक्षेत प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही या शुद्धीपत्रकात म्हटले आहे.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!