मुंबईः अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतूजा लटके मोठ्या मताधिक्याने विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पंधराव्या फेरीअखेर त्यांना ५५हजार ९४६ मते मिळाली आहेत. ऋतूजा लटके यांच्या विजयी घोडदौडीमुळे शिवसेनेला नवीन ऊर्जा मिळाली असून शिवसेना भवनाबाहेर जोरदार सेलिब्रेशन सुरू झाले आहे.
आज सकाळी आठ वाजेपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली शाळेत अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच ऋतूजा लटके यांची विजयी घोडदौड सुरू आहे. पहिल्या फेरीत त्यांना ४ हजार २७७ तर दुसऱ्या फेरीत ७ हजार ८१७ मते मिळाली. ही विजयी घोडदौड अशीच सुरू राहून त्यांना सातव्या फेरी अखेर २४ हजार ९५५ तर आठव्या फेरीअखेर २९ हजार ३३ मते मिळाली. आकराव्या फेरीअखेर लटके यांना ४२ हजार ३४३ मते मिळाली तर या फेरीअखेर नोटाला ८ हजार ३७९ मते मिळाली. बाळा नाडर यांना या फेरीअखेर १ हजार ५२ मते मिळाली.
या निवडणुकीत ऋतूजा लटके यांच्या नंतर नोटालाच दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली आहेत. बाराव्या फेरीअखेर ऋतूजा लटके यांना ४५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. या फेरीनंतर ऋतूजा लटके यांना ४५ हजार २११ मते मिळाली तर नोटाला ८ हजार ८८७ मते मिळाली आहेत.
शिवसेना नेते अनिल परब यांनी अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच ऋतूजा लटके यांना मोठा विजय मिळेल, असा दावा करतानाच लटके या ९० ते ९५ टक्के मिळवतील, असे म्हटले होते. शिवसेनेचे अन्य एक नेते रवींद्र वायकर यांनीही ऋतूजा लटके या ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून विजयी होती, असा दावा केला होता. या निवडणुकीच्या निकालानंतर या दोघांचेही दावे खरे ठरले आहेत.
अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी नोटाला मतदान करा, असा प्रचार सुरू झाला होता. त्या प्रचाराचे परिणाम या निवडणुकीत पहायला मिळाले आहेत. या निवडणुकीत अपक्षांना मागे टाकत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
चौदाव्या फेरीतील मतेः ऋतूजा लटकेः ५२ हजार ५०७, बाळा नाडरः १ हजार २४०, मीना खेडकरः १ हजार १९०, फरहान सय्यदः ८९७, मिलिंद कांबळेः ५१९, राजेश त्रिपाठीः १ हजार २९१, नोटाः १० हजार २८४, एकूण मतमोजणीः ६८ हजार ६७६
या मतमोजणीसाठी २०० कर्मचारी तैनात करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध खात्याच्या अखत्यारितील अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी कार्यरत आहेत.