
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बनावट व खोट्या एम.फिल. पदव्या तयार केल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि त्याची पत्नी तथा संस्थेची सचिव आस्मा खान यांना बेड्या ठोकल्यानंतर आता पोलिसांनी कोहिनूर महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे आपला मोर्चा वळवला असून बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे या महाविद्यालयात कुणी नोकरी तर मिळवली नाही ना? याची झाडाझडती आता पोलिस घेणार आहेत. तसे पत्रच सिटीचौकचे पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांना दिले आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सहसंचालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पत्र लिहून खासदूतामार्फत ही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या पत्रावर विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
पुण्याच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगोचा वापर करून कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान या दोघांनी अनुक्रमे इंग्रजी आणि हिंदी विषयातील एम.फिल.च्या बोगस पदव्या तयार केल्या. या बनावट आणि खोट्या एम.फिल. पदव्यांच्या आधारे त्यांनी २०२१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेतून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश मिळवला.
या दोघांकडे असलेली एम.फिल.ची पदवी प्रमाणपत्रे बनावट व खोटी असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने लेखी कळवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांनी बेगमपुरा पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी आस्मा इद्रिस खान व पठाण मकसूद खान या दोघांच्या विरोधात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आणि ३० मार्च रोजी आस्मा खानला अटक करण्यात आली. आस्मा खानच्या चौकशीत या बनावट पदवी प्रकरणाचा मास्टरमाइंड कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान हाच असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी ६ एप्रिल रोजी त्यालाही बेड्या ठोकल्या.
या बनावट व खोट्या पदव्या प्रकरणाची व्याप्ती आस्मा खान व मकसूद खान यांच्यापुरतीच मर्यादित नसून ती मोठी असल्याचा पोलिसांना संशय आहे. डॉ. मझहर खान याच्या खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातही अशाच बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे काही प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही नोकरी तर मिळवलेली नाही ना? याचाही शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.
सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांना आधी ४ एप्रिल आणि नंतर ८ एप्रिल रोजी दोन पत्रे लिहून कोहिनूर महाविद्यालयातील आतापर्यंत नियुक्त करण्यात आलेल्या सर्वच सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली आहे. सिटी चौक पोलिसांची ही दोन पत्रे प्राप्त झाल्यानंतर विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंना ९ एप्रिल रोजी पत्र लिहून कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सेवाविषयक माहिती खासदूतामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सेवाविषयक माहिती तत्काळ उपलब्ध करून द्यायची असल्यामुळे विनाविलंब आणि न चुकता सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी, असे विभागीय सहसंचालकांनी विद्यापीठाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कोहिनूर महाविद्यालयात आतापर्यंत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबतची सर्व अभिलेखे दोन साक्षांकित प्रतीत तसेच मूळ सेवापुस्तिका आणि या अभिलेखाबाबतचा स्वयंस्पष्ट अभिप्राय खासदूता मार्फत तत्काळ तत्काळ सादर करण्यास विद्यापीठाला सांगण्यात आले आहे.
पदमान्यता, विद्यापीठाची जाहिरातीला मान्यता, वृत्तपत्रात प्रसिद्ध जाहिरातीची प्रत, प्राप्त आवेदनपत्रांची यादी, निवड समितीचा अहवाल, नियुक्ती आदेश, संबंधिताने नियुक्तीसाठी अर्ज सादर करताना सादर केलेली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, नियुक्तीनंतर प्राप्त सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, रूजू अहवाल, विद्यापीठाचे मान्यता पत्र, महाविद्यालयात कार्यरत अध्यापकांनी पीएच.डी. पदवीसाठी विविध विद्यापीठाकडे सादर केलेली कागदपत्रे, प्रस्ताव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची यादी आणि स्वयंस्पष्ट अभिप्राय इत्यादी माहिती विभागीय सहसंचालकांनी विद्यापीठ प्रशासनाकडून मागवली आहे.

‘तत्काळ’पत्राला विद्यापीठाकडून ‘संथ’ प्रतिसाद
बनावट व खोट्या पदवी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सेवाविषयक माहिती व शैक्षणिक कागदपत्रे खासदूतामार्फत तत्काळ सादर करण्याचे विभागीय सहसंचालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ९ एप्रिल रोजी पत्र लिहून सांगितले खरे परंतु सहा दिवस उलटूनही या पत्रावर विद्यापीठाकडून ‘तत्काळ’ कार्यवाही झालेली नाही. गेल्या सहा दिवसात चार दिवस सुट्या आलेल्या असल्या तरी नेट/सेटमधून सूट मागणाऱ्या एम.फिल.धारक प्राध्यापकांच्या प्रस्तावातील यूजीसीने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सुटीच्या दिवशीही आपले कर्मचारी कामाला गुंतवून ‘तत्परता’ दाखवली होती. मग या संवेदनशील विषयातही तशीच ‘तत्परता’ का दाखवण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.
या संदर्भात शैक्षणिक तसेच आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांच्याशी न्यूजटाऊनने संपर्क साधला असता विभागीय सहसंचालकांकडून असे पत्रच प्राप्त झाले नाही. जे पत्र प्राप्त झाले ते प्रभारी प्राचार्यांच्या नेमणुकीची कार्यवाही करण्याबाबतचे आहे, असे डॉ. गणेश मंझा म्हणाले. न्यूजटाऊनने हे पत्र त्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर ‘पाहून घेतो’ असे मंझा म्हणाले. यावरून संवेदनशील विषयातील ‘तत्काळ’ पत्राला विद्यापीठ प्रशासनाकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे स्पष्ट झाले आहे.
किती जणांचे वाजणार ‘बारा’?
खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सेवाविषयक माहिती व शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती विद्यापीठाकडून प्राप्त झाल्यानंतर विभागीय सहसंचालकांकडून त्या बनावट व खोट्या पदवी प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांना उपलब्ध करून दिल्या जातील. नंतर पोलिसांकडून ही कागदपत्रे ज्या विद्यापीठांची आहेत, त्या त्या विद्यापीठांकडे पडताळणीला पाठवली जातील. या पडताळणीत कोहिनूरमधील किती जणांचे ‘बारा’ वाजतात आणि किती जणांच्या हाती बेड्या पडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

