औरंगाबादः प्रेमात पडून सुमारे बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेली एक महिला दुसऱ्यांदा प्रेमात पडली. दुसऱ्या प्रियकराच्या प्रेमात पहिला प्रियकर असलेला पती अडसर ठरू लागल्याने ‘डबल प्रेमात’ पडलेल्या आणि नंतर पतीपासून विभक्त राहू लागलेल्या महिलेने पतीला आधी मनसोक्त दारू पाजली. नंतर निर्जन स्थळी नेऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. या प्रकरणी पोलिसांनी ‘डबल प्रेमा’त पडलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
औरंगाबादेतील एन-११ सिडको भागात राहणारे विजय संजयकुमार पाटणी (वय ३५) आणि सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी येथे राहणाऱ्या सारिका विजय पाटणी (वय ३०) यांचा सुमारे बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आधी प्रेमात पडून आणाभाका घेतल्यानंतर हे दोघे एप्रिल २०१० मध्ये विवाहबद्ध झाले होते. प्रेमविवाहानंतर दोघांचा संसार एका तपापर्यंत गुण्यागोविंदाने चालला होता. मात्र या दोघांच्या संसारात फेसबुकवरील मैत्रीने विघ्न आणले आणि या विघ्नामुळे विजयचा खून झाला आणि बारा वर्षांच्या संसाराचा शेवट झाला. विजय पाटणी यांचा डिजिटल बिझनेस कार्ड आणि मिनी वेबसाईटचा व्यवसाय होता.
सारिका विजय पाटणी हिची फेसबुकवर सागर मधुकर सावळे (वय २५ वर्षे, रा. शिवाजीनगर, औरंगाबाद) याच्याशी मैत्री जुळली. या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. सागर आणि सारिका यांचे प्रेम प्रकरण सुरू असतानाच सारिका आणि विजय यांच्यात संशय आणि नोकरीवरून मतभेद झाले. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी सारिका आणि विजयने एकमेकांपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता.
पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सारिकाने टॅली करून वाळूजमध्ये नोकरी मिळवली. ती मुलीसोबत तिच्या माहेरी म्हणजेच सलामपुरे नगर, वडगाव कोल्हाटी येथे राहयला गेली. विजयकडून आपला सततचा पाठलाग होऊ नये म्हणून तिने विजयला आपण कुवेतला जात असल्याचे सांगितले होते.
विभक्त झाल्यानंतर विजय वृद्ध आईसह सिडकोत रहात होता. तर सारिका तिच्या आईच्या घरी राहत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून विजय सारिकाकडे सोबत राहण्याचा तगादा लावत होता आणि तिच्या घरी जाऊन तिला वारंवार समजावत होता. मात्र दुसऱ्या प्रियकराच्या प्रेमात मश्गुल झालेल्या सारिकाला विजयसोबत रहायचेच नव्हते.
विजयच्या सततच्या तगाद्यातून मुक्ती मिळवण्यासाठी सारिकाने विजयच्या हत्येचा कट रचला. १८ ऑक्टोबर रोजी तिने पती विजयला फोन करून आपण बाहेर फिरायला जाऊ, असा कॉल करून विजयला बोलावून घेतले. तत्पूर्वी सारिकानेएक स्प्रे आणि धारदार चाकू खरेदी करून ठेवला होता. विजयला घेऊन पैठणला जाण्याचे तिने ठरवले.
तेथे गेल्यावर सारिकाने पती विजयकडे दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही दारू प्यायले. सारिकाने कमी दारू घेतली मात्र विजयला मनसोक्त दारू पाजली. परत निघाल्यावर दोघे नवीन धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाल्मीजवळील उड्डाणपुलावर पोहोचले. तेथे पोहोचल्यावर दारूच्या नशेत तर्रर असलेल्या विजयच्या डोळ्यावर सारिकाने स्प्रे मारला. तो गडबडून खाली पडताच सारिकाने स्वतःजवळील धारदार चाकूने विजयच्या पोटात सपासप वार केले.
विजय रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सारिकाने तिचा दुसरा प्रियकर सागरला बोलावून घेतले. मात्र सागरने विजयच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सारिकाने सागरवर दबाव टाकला. त्याला खूनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. अखेर सागरने विजयचा मृतदेह खड्ड्यात ढकलून दिला. त्यानंतर दोघेही तिथून निघून गेले.
घटनेच्या चार दिवसांनंतर म्हणजेच २२ ऑक्टोबरला सारिकाने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आम्ही १८ ऑक्टोबर रोजी पैठण, पडेगावला फिरायला गेलो होते. तेथून आल्यावर मला रात्री १० वाजता घरी सोडून गेल्यानंतर पती बेपत्ता झाल्याचे सारिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते. विशेष म्हणजे अतिशय थंड डोक्याने पती विजयचा खून केल्यानंतर सारिकाने तिच्या सासूची भेटही घेतली आणि विजय लवकरच परत येतील, असा दिलासाही दिला होता.
खूनानंतर तब्बल १२ दिवसांनी म्हणजे गेल्या शुक्रवारी विजयचा सडलेला मृतदेह नागरिकांना दिसला. नागरिकांकडून माहिती मिळताचसहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, कल्याण शेळके, गजानन सोनटक्के, सातारा पोलिस ठाण्याचे सर्जेराव सानप, नंदकुमार भांरी यांनी घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असताना त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुन्हे शाखा आणि सातारा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान ९० बेपत्ता लोकांच्या तक्रारींचे विश्लेषण केल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेल्या व्यक्तीबाबतच्या तक्रारीत त्याच्या हातावर ओम असल्याचा उल्लेख होता. याही मृतदेहाच्या हातावर ओम कोरलेले होते. पोलिसांनी तपास त्यादिशेने सुरू केला.
पोलिसांनी सारिकाचे घर गाठले. तिची चौकशी केली. सुरूवातीला सारिकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र चौकशी दरम्यान उत्तरे देताना ती गडबडू लागल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तांत्रिक तपासात सारिकाला प्रियकर असल्याचेही स्पष्ट झाला आणि पोलिसांनी रविवारी सारिकाचा प्रियकर सागरला ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. या प्रकरणी पत्नी सारिका आणि तिला मदत करणारा तिचा प्रियकर सागरला अटक केली असून सातारा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.