मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून पुढील तीन दिवस त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस शरद पवार ब्रीच कँडीमध्ये उपचार घेणार आहेत. त्यांना २ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे गर्जे यांनी पत्रकात म्हटले आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम सुरू होती. २ नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते ३ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे जाणार आहेत. ४ व ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पक्षाच्या दोन दिवसीय शिबिरात शरद पवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती गर्जे यांनी दिली आहे.