‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खानविरूद्ध बेगमपुरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, पीएचडीचे प्रवेशही रद्द करणार


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अनेक कारनाम्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान यांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पेटमधून सूट मिळवून पीएच.डी.ला मिळवल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून आता या दोघांचेही पीेएच.डी. चे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी दिली. २२ मार्च रोजी न्यूजटाऊनने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून अनुक्रमे इंग्रजी आणि हिंदी विषयातील बनावट एम.फिल.ची पदवी तयार केली. या बनावट एम.फिल.पदवीच्या आधारे या दोघांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०२१ मध्ये पेटमधून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान  यांची डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिल पदवीही बोगस!

या दोघांच्याही एम.फिल. पदवीची खातरजमा करण्यासाठी रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला असता या दोघांच्याही एम.फिल.च्या पदव्या बनावट आणि खोट्या असल्याचे निष्पन्न झाले होते. आमच्या विद्यापीठात कोणत्याही विषयातील एम.फिल. हा अभ्यासक्रमच चालवला जात नाही, त्यामुळे या दोघांना एम.फिल.ची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलसचिवांनी लेखी कळवले होते.

हेही वाचाः डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने घेतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाने १३ मार्च रोजी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडे या दोघांच्या एम.फिल. पदव्यांबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यापत्राला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने मंगळवारी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवांना ईमेलद्वारे उत्तर दिले.

हेही वाचाः कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, बनावट बीएचएमएस पदवी प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

 डॉ. आस्मा खान आणि पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान यांच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या एम.फिल.च्या पदव्या बनावट आणि खोट्या आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ एम.फिल.चा अभ्यासक्रमच चालवत नाही. या दोघांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बनावट व खोट्या पदव्या तयार केल्या असल्याचे या ईमेलमध्ये म्हटले आहे. डॉ. वाय. पाटील विद्यापीठाकडून ईमेल प्राप्त होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वेगाने सूत्रे हालली आणि आज कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या सूचनेनुसार या दोघांचेही पीएच.डी.चे प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विजय राजाराम मोरे यांनी आज आस्मा खान आणि पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी आस्मा इद्रिस खान व पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१८(२), ३३६ (३), ३४० (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मान्यता अखेर रद्द, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विद्यापीठाची कारवाई

काय म्हटलंय एफआयआरमध्ये?

मी विजय राजाराम मोरे वय ५० वर्षे, व्यवसाय- नोकरी (उप कुलसचिव विदयावाचस्पती विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ छत्रपती संभाजीनगर) समक्ष पोलीस स्टेशनला हजर येऊन तक्रारी जबाब देतो की, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ छत्रपती संभाजीनगर येथे विदयावाचस्पती विभाग (पीएचडी ) येथे नोव्हेंबर २०२३ पासून उपकुलसचिवपदावर कार्यरत आहे.

हेही वाचाः कोहिनूरच्या अध्यक्षांची ‘चारसौ बीसी’: मुक्त विद्यापीठाच्या स्वतःच्याच परीक्षा केंद्रावर प्राध्यापकांवर दबाव टाकून सोडवून घेतले स्वतःचे एमए हिंदीचे पेपर!

विदयापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्षे २०२१ करिता पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) घेण्यात आली होती. पीएचडीच्या अभ्यासक्रमाच्या नोंदणीकरिता पेट परीक्षा आवश्यक आहे. परंतु विदयापीठाच्या विविध परिनियमांप्रमाणे यापूर्वी एम.फिल. पदवी प्राप्त असलेल्या विदयार्थ्यांना पेट परीक्षेतून सूट देण्यात येत होती. सदर सूट मिळवण्याच्या उद्देशाने हिंदी व इंग्रजी विषयातील संशोधक विद्यार्थी अनुक्रमे १) पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान रा. महाळ किन्होळा, वडोदबाजार ता. फुलंब्री, जिल्हा- छत्रपती संभाजीनगर व २) खान आसमा इद्रिस रा. प्लॉट नं ५२, एन ११एल सेक्टर, यादवनगरजवळ, हडको कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर यांनी सन २०१२ मध्ये विदयापीठास अर्ज सादर केला होता व सदर अर्जासोबत त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ, पुणे यांचेकडून एम. फिल. अभ्यासक्रमाची पदवी जोडली होती.

प्रथमदर्शनी सदर पदवी संशयास्पद दिसून येत नसल्याने व पीएचडी नोंदणीचे वेळापत्रक लक्षात घेता दोन्ही विदयार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येऊन त्यांना पेट परीक्षेतून सूट देण्यात आली होती. परंतु दरम्यानच्या काळात सदर पदवी प्रमाणपत्रे पडताळणी करण्याचे उद्देशाने १३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४.३०. वाजता ईमेलद्वारे डॉ. डी.वाय पाटील विदयापीठ, पुणे यांचेकडे पाठवण्यात आले होते. सदर विदयापीठाने २५ मार्च २०२५ रोजी सायकांळी ५,४५ वाजता आमच्या कार्यालयास ईमेलद्वारे पत्र देऊन कळवले कि, त्यांच्या विदयापीठात एम. फील. हा अभ्यासक्रमच चालवण्यात येत नाही. याशिवाय वरील नमूद दोन्ही विदयार्थ्यांनी त्यांच्या विदयापीठात कधीही कोणत्याही अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला नव्हता.

डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ पुणे यांच्या २५ मार्च रोजीच्या पत्राद्वारे ही बाब स्पष्ट झाली की, पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान व खान आसमा इद्रिस यांनी पीएच.डी. प्रवेश परिक्षेतून सूट मिळवण्यासाठी डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठ पुणे यांचेकडील एम.फील. अभ्यासक्रमाची खोटी व बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र खरे असे भासवून दाखल करुन प्रवेश मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाची फसवणूक केली आहे. तरी त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही होणेस विनंती आहे.

पीएच.डी.चे प्रवेश रद्द करणार

’एम.फिल’ची खोटी पदवी प्रमाणपत्र दाखल करुन ’पीएच.डी’ला प्रवेश घेणा-या दोन जणांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी न्यूजटाऊनशी बोलताना दिली. खान आस्मा इद्रिस आणि पठाण मकसूद पठाण अन्वर खान यांनी सादर केलेल्या एम. फिल. पदवी प्रमाणपत्राची पडताळणी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी संपर्क करुन करण्यात आली. दोघांचीही एम. फिल. पदवी प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे विद्यापीठाच्या वतीने बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या दोघांचेही पीएच.डी.चे प्रवेश रद्द करण्यात येतील. अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत, असे डॉ. सरवदे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!