
कोल्हापूरः शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीवरून कोल्हापूरचे वातावरण चांगलेच पेटलेले असताना आज झालेल्या अधिसभेच्या बैठकीत ही या मागणीवरून जोरदार खडाजंगी झाली. नामविस्ताराला विरोध करणाऱ्या सदस्यांनी ‘आमचे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. अखेर शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध करणारा स्थगन प्रस्ताव चर्चेविनाच स्वीकारण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. डी.व्ही. शिर्के यांनी जाहीर केले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न तूर्तास थंड्या बस्त्यात पडली आहे.
शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा, अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून १७ मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला विरोध म्हणून शाहू सेनेने प्रतिमोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या मागणीचे तीव्र पडसाद आज झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीतही उमटले. नामविस्ताराच्या मागणीला अनेक सदस्यांनी कडाकडून विरोध केला. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार केल्यास शिवाजी महाराजांचे नावच घेतले जाणार नाही, त्या नावाचा शॉर्टफॉर्म केला जाईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली.
राजर्षि शाहू महाराज सभागृहात आज शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची अर्थसंकल्पीय बैठक झाली. या बैठकीत एकूण ६४ विषयांवर चर्चा करण्यात आली. अधिसभेची बैठक सुरू होताच अभिषेक मिठारी, श्वेता परूळेकर, संजय परमाने, अजित पाटील, अमित जाधव इत्यादी अधिसभा सदस्यांनी नामविस्ताराचा मुद्दा उपस्थित केला आणि शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करू नये, असा स्थगन प्रस्ताव मांडला.
हा स्थगन प्रस्ताव स्वीकारला की नाकारला, हे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी जाहीर करावे, अशी आग्रही मागणी अधिसभा सदस्य अभिषेक मिठारी आणि श्वेता परूळेकर यांनी लावून धरली. नामविस्ताराच्या विरोधात असलेल्या अधिसभा सदस्यांनी ‘शिवाजी महाराज की जय’, ‘आमचे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ अशी अशी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. जोपर्यंत स्थगन प्रस्ताव स्वीकारला की नाही, हे कुलगुरू जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत अधिसभा बैठकीचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका नामविस्ताराला विरोध करणाऱ्या अधिसभा सदस्यांनी घेतली. अखेर अधिसभा बैठकीचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. डी. व्ही. शिर्के यांनी हा स्थगन प्रस्ताव चर्चेविनाच स्वीकारल्याचे जाहीर केले.
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा प्रश्न तेव्हाच सोडवला आहे. आता काही संघटना विनाकारण लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप नामविस्ताराला विरोध करणाऱ्या अधिसभा सदस्यांनी केला.
कोल्हापूरच्या विद्यापीठाला नाव देताना ‘शिवाजी विद्यापीठ’ असा जाणीवपूर्वक उल्लेख त्यावेळच्या सर्व अभ्यासक, तज्ज्ञांनी केला होता. लांबलचक नाव असेल तर त्याचे लघुरूप वापरले जाते. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचा उल्लेख सीपीआर असा केला जातो. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सचा उल्लेख सीएसटीएम असा केला जातो. त्यामुळे नामविस्तारातील धोके लक्षात घेणे गरजेचे आहे, असे अभिषेक मिठारी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नामविस्तार कराल तर ठोकून काढू
कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींनी नामविस्ताराला विरोध केला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवप्रेमींची नुकतीच एक बैठक झाली. विद्यापीठाला शिवाजी हेच नाव देण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. पण कोणी बाहेरून येऊन विद्यापीठाचा नामविस्तार करत असेल तर त्याला बैठप्रसंगी ठोकून काढू, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.
शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे. या शब्दात प्रचंड ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठाला दिलेले नाव योग्य आहे. ते कोणीही बदलण्याचा प्रयत्न करू नये. जर कोणी बदलणार असेल तर त्यांना नावामागचा इतिहास समजून सांगू, अन्यथा अशा प्रवृत्तींना ठोकून काढल्याशिवाय पर्याय नाही, असे डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले.