‘हलाल विरुद्ध झटका’ वाद चिघळणार?, हिंदूंच्या दुकानातूनच मटन खरेदी करा, मंत्री नितेश राणेंचा फतवा; महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वालाच ‘झटका’!


मुंबईः वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहणारे राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी हिंदू मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूच मटन खरेदी करा, असा फतवा काढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘हलाल विरुद्ध झटका’ मटनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. मंत्री नितेश राणे यांच्या या फतव्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वालाच ‘झटका’ बसला आहे.

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून कट्टरता चांगलीच डोके वर काढू लागली आहे. त्या कट्टरतेला सत्ताधाऱ्यांकडूनच हवा दिली जाऊ लागल्यामुळे ही कट्टरता आता लोकांचे ताट आणि पोटापर्यंत पोहोचली आहे, हेच महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी काढलेल्या फतव्यावरून स्पष्ट झाले आहे.

मंत्री नितेश राणे यांनी मांसाहार प्रेमी हिंदूंसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन’ आणले आहे. हे सर्टिफिकेशन महाराष्ट्र सरकारचे अधिकृत सर्टिफिकेशन आहे काय?, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नसले तरी जिथे मल्हार सर्टिफाइड झटका मांस नसेल तिथे हिंदू समाजाने मटन खरेदी करू नये, असा फतवाच त्यांनी काढला आहे.

 मंत्री नितेश राणे यांनी सेमवारी ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे उद्घाटन केले असून या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हिंदू समाजाने हिंदूंच्याच दुकानातून झटका मटन खरेदी करण्याचा फतवा काढला आहे.

मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडीओ शेअर करत हा फतवा जारी केला आहे. ‘आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस… आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेले आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकाने उपलब्ध होतील व १०० टक्के हिंदू समाजाचे प्राबल्य असेल. विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटनामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही,’ असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

‘हलाल’च्या नावाखाली हिंदूंविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. आता त्यांना मोठा झटका बसणार आहे.मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा. किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने मटन खरेदी करू नये. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरूण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून फक्त हिंदू खाटकांनाच सर्टिफिकेशन दिले जाणार आहे. आमचा या प्रयत्नांना शंभर टक्के पाठिंबा आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

मंत्री नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा मुस्लिम समाजावर जहरी भाषेत टिकाही केलेली आहे. त्यातच त्यांनी आता हिंदू समाजाने हिंदूंच्या दुकानातूनच झटका मटन खरेदी करण्याचा फतवा जारी केला आहे.

मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदूंना झटका मटन उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. त्यांनी वापरलेला ‘आमचा’ हा शब्द सरकारसाठी आहे की व्यक्तिशः त्यांच्यासाठी आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!