‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी कसा आणि कुठे करायचा अर्ज?, संपूर्ण प्रक्रिया वाचा आणि लगेच करा अर्ज; अन्यथा मोजावा लागेल मोठा भूर्दंड


मुंबईः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली असून ही नंबरप्लेट बदलून घेण्यासाठी ३० मार्चपर्यंत असलेली मुदत १ महिन्याने वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. या वाढीव मुदतीत एचएसआरपी नंबरप्लेट न लावणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

ज्या वाहनधारकांनी १ एप्रिल २०१९ नंतर वाहनांची खरेदी केलेली आहे, त्यांना परिवहन विभागाकडून एचएसआरपी नंबरप्लेट बसवून देण्यात आल्या आहेत. त्यांना आता नवीन नंबरप्लेट बसवून घेण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी २०१९ पूर्वी वाहन खरेदी केली आहे, अशा सर्वप्रकारच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्यासाठी महाराष्ट्रातील ५७ प्रादेशिक कार्यालयांसाठी तीन स्वतंत्र झोन करण्यात आले आहेत. या तीन झोनसाठी एचएसआरपी नंबरप्लेट बदलून देण्यासाठी तीन एजन्सीजची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंतच्या मुदतीतच २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 या मुदतीनंतर एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२(१) अन्वये कारवाई केली जाणार आहे. या कलमान्वये ५ हजार रुपये दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे. ही कारवाई टाळण्यासठी वाहनधारकांनी दिलेली मुदतीत एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

कशी मिळवायची एचएसआरपी नंबरप्लेट?

२०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्वप्रकारच्या वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्यासाठी सर्व वाहनधारकांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच अर्ज करावा लागणार आहे. कोणत्याही वाहनधारकांना ऑनलाइन प्रक्रियेशिवाय एचएसआरपी नंबरप्लेट देण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीद परिवहन विभागाकडून एजन्सीजना देण्यात आली आहे. त्यामुळे ही ऑनलाइन प्रक्रिया समजून घेऊ या…

  • सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या वेबसाईटवर जा.
  • या लिंकवर गेल्यानंतर स्क्रीनवर Apply High Security Registration Plate Online असा पर्याय दिसेल. या पर्यायासोबत दिलेल्या विंडोमध्ये Select Office वर क्लिक करून तुमच्याशी संबंधित आरटीओ कार्यालय निवडा आणि Submit च्या पर्यायावर क्लिक करा.
  • Submit चा पर्याय क्लिक केल्यानंतर नवीन ओपन होईल. स्क्रीनवर तुम्हाला तुमचे आरटीओ कार्यालय ज्या झोनमध्ये असेल त्या झोनचा क्रमांक दिसेल. समजा जर तुम्ही MH20 AURANGABAD असे आरटीओ कार्यालय निवडलेले असेल तर तुम्हाला स्क्रीनवर HSRP FOR MAHASHTRA ZONE 2 असे दिसेल.
  • HSRP FOR MAHASHTRA ZONE 2 च्या खाली तीन पर्याय दिलेले असतील. तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अर्ज करत असाल तर तिसरा पर्याय म्हणजेच APPLY HSRP निवडा.
  • APPLY HSRP वर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला चार पर्याय दिसतील. त्यातील पहिला पर्याय Order HSRP वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या विंडोजमध्ये तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर (शेवटचे पाच आकडे), इंजिन नंबर (शेवटचे पाच आकडे) आणि तुमचा मोबाइल नंबर टाका आणि Validate  च्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या मोबाइवर ओटीपी येईल. तो दिलेल्या विंडोमध्ये प्रवेशित करून तुम्ही दिलेली माहिती व्हॅलिडेट करा.
  • ही सर्व माहिती नोंदवल्यानंतर वाहनधारकांना एचएचआरपी नंबरप्लेट बदलून घेण्यासाठी लोकेशनची माहिती दिली जाईल. त्यानंतर अपाइंटमेंट स्लॉट घ्यावा लागेल आणि माहितीची खातरजमा केल्यानंतर ऑनलाइन पैसे भरून तुम्हाला एचएसआरपी नंबरप्लेट बदलून दिली जाईल.
  • ज्या दिवशी तुमचा अपॉइंटमेंट स्लॉट असेल त्या तारखेला तुम्हाला तुमचे वाहन घेऊनच प्रत्यक्ष लोकेशनवर जावे लागेल. तुम्ही जर बाहेरगावी रहात असाल तर तुम्हाला कुरिअर किंवा पोस्टाने एचएसआरपी नंबरप्लेट पाठवली जाणार नाही.
  • वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदवलेली वाहनाची माहिती आणि प्रत्यक्ष वाहनाची माहिती यात तफावत आढळून आली तर एचएसआरपी नंबरप्लेट दिली जाणार नाही आणि त्यासाठी भरलेले शुल्कही परत दिले जाणार नाही. त्यामुळे तुमच्या वाहनाची माहिती काळजीपूर्वक भरा.

कोणत्या वाहनासाठी किती शुल्क?

एचएसआरपी नंबरप्लेटसाठी वेगवेगळ्या वाहनासाठी वेगवेगळे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये, तीन चाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी किंवा त्यापेक्षा जास्त चाकांच्या वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क वाहनधारकांना ऑनलाइन भरावे लागणार आहे.

तुमचा मोबाइल नंबर आरटीओशी लिंक आहे का?

एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदवला गेलेला असला पाहिजे. ज्या वाहनधारकांचा मोबाइल नंबर आरटीओकडे लिंक केलेला नसेल त्यांना एचएसआरपी नंबरप्लेटसाठी थेट ऑनलाइन अर्ज करता येणार नाही. त्यासाठी अशा वाहनधारकांना आधी मोटार वाहन विभागाच्या पोर्टलवर जाऊन मोबाइल क्रमांक नोंदवून लिंक करून घ्यावा लागेल. त्यानंतरच एचएसआरपी नंबरप्लेट मिळवण्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया करता येईल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!