२ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या ७ वर्षीय मुलाची सुखरुप सुटका, संभाजीनगर पोलिसांनी २४ तासांच्या आत ५ आरोपींच्या आवळल्या मुसक्या!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या बांधकाम व्यावयासिक सुनिल तुपे यांचा सात वर्षीय मुलगा चैतन्यचा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पोलिसांनी २४ तासांच्या आत शोध घेऊन त्याची सुखरुप सुटका केली असून चैतन्यचे अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे बेड्या ठोकल्या आहेत. ३० पोलिस अधिकारी आणि १५० पोलिस अंमलदारांच्या २० पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही कामगिरी बजावली.

सुनिल तुपे हे बांधकाम व्यावसायिक आहेत तर त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. तुपे हे सिडको एन-४ मधील सेक्टर एफ-१ मध्ये राहतात. मंगळवारी (४ फेब्रुवारी)  रात्री  साडेआठ वाजेच्या सुमारास सुनिल तुपे हे त्यांच्या दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते. चैतन्यचा लहान भाऊ वडिलांसोबत खेळत होता. तर चैतन्य सायकलवर खेळत होता.

चैतन्य साकलवरून घरापासून एन-४ च्या रस्त्याच्या दिशेने जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली. अपहरणकर्त्यांनी त्यांची कार चैतन्यच्या सायकलच्या बाजूला थांबवली होती. कारमधून चालकाच्या मागील बाजूने दोघे जण उतरले. एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले तर दुसऱ्याने सायकल चालवत नेऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली होते. त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले होते.

 चैतन्य सायकलवर लांब गेला असेल म्हणून वडिल सुनिल तुपे त्याला परिसरातच शोधत होते. तेवढ्यात त्यांच्या मोबाइलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना आधी मराठी व नंतर हिंदीतून ‘बच्चा चाहिए तो २ करोड देना पडेगा’ असे म्हणत खंडणीची रक्कम दिली नाही तर मुलाला ठार मारण्याची धमकी दिली.

चैतन्यचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच तुपे कुटुंबाने पोलिस आयुक्तालयात धाव घेतली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हे शाखा, अंमली पदार्थविरोधी पथक, सायबर पोलिस ठाणे व सर्व पोलिस ठाण्याचे विशेष तपास पथकांना अपह्रत मुलाचा तत्काळ शोध घेऊन आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले.

पोलिस आयुक्त पवार यांच्या आदेशानंतर परिमंडळ-२ चे पोलिस उपआयुक्त शिलवंत नांदेडकर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पगारे उस्मानपुरा विभागाचे पोलिस सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह ३० अधिकारी आणि १५० पोलिस अंमलदारांची २० तपास पथके स्थापन करण्यात आली.

या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व शक्यतांचा विराचर करून माहिती काढली आणि मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून घटना घडल्यापासून  या गुन्ह्यातील अपह्रत मुलगा चैतन्य व आरोपींचा शोध घेण्यासाठी द्रुतगतीने तपासाची चक्रे फिरवली.

या तपास पथकांनी चिकाटीने आरोपींचा पाठपुरावा करून २४ तासांच्या आत जालना जिल्ह्यातील भोकरदन व जाफ्राबाद येथून हर्षल पंढरीनाथ शेवत्रे ( वय २१), जीवन नारायण शेवत्रे (वय २६), प्रणव समाधान शेवत्रे (वय १९), कृष्णा संतोष पठाडे (वय २०) (सर्व राहणार रा. ब्रह्मपुरी, ता. जाफ्राबाद) आणि शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड (वय २०, रा. आळंद, ता. जाफ्राबाद) यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून अपह्रत मुलगा चैतन्यची सुखरुप सुटका केली.

कारला अपघात झाला अन्…

  • छत्रपती संभाजीनगरहून (औरंगाबाद) चैतन्यला घेऊन सुसाट निघालेले अपहरणकर्ते  फुलंब्री, हसनाबाद, भोकरदनमार्गे जाफ्राबादकडे जात होते. ते जाफ्राबादकडे जात असताना ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भोकरदनजवळील आसई पाटीजवळ भाजीपाला भरण्यासाठी उभ्या असलेल्या गाडीला या कारची धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला.  कारला एवढा गंभीर अपघात होऊनही अपहरणकर्त्यांनी अंधाराचा फायदा घेत चैतन्यला घेऊन शेजारच्या शेतात पळाले होते.
  • या अपघातात जखमी झालेला अपहरणकर्ता प्रणव समाधान शेवत्रे हा कारमधून बाहेर पडून पळ काढण्याच्या तयारीत असतानाच अपहरणकर्त्यांनी ज्यांच्या गाडीला धडक दिली त्या गाडीचे चालक गजानन भावले यांनी त्याला पकडून ठेवले आणि नागरिकांच्या मदतीने त्याला भोकरदन ग्रामीण रूगणालयात नेले आणि पोलिसांना खबर दिली.
  • अन्य चार अपहरणकर्त्यांनी लगेच दुसरी गाडी बोलवून घेऊन चिखलीच्या दिशेने पोबारा केला होता. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पोलिसांची तपास पथके त्यांच्या मागावरच होती. चैतन्यचा अपहरणकर्ता पकडल्याचे समजताच चैतन्यच्या नातेवाईकांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. त्यामुळे प्रणवला भोकरदन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने अपल्या अन्य साथीदारांची नावे सांगितली.
  • माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा माग काढण्यास सुरूवात केली. अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन जाफ्राबाद तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे पोहोचताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले आणि चैतन्यची सुखरूप सुटका केली.

या कारवाईत गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके, काशीनाथ महांदळे, कदीर देशमुख, पोलिस उपनिरीक्षक विशाल बोडके, संदीप सोळंके, संदीप शिंदे, प्रवीण वाघ यांच्यासह गुन्हे शाखेचे अंमलदार आणि पोलिस ठाण्यातील विशेष पथकाचे पोलिस अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कराळे, पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम, प्रमोद देवकते, गणेश केदार यांच्यासह त्यांच्या पोलिस ठाण्यातील अंमलदार व विशेष पथकाचे अधिकारी तसेच अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रकरणी सुनिल तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रसंशा केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!