‘नॅक’च्या A++ रेटिंगसाठी कोट्यवधींची लाचखोरीः पीअर टिमच्या अध्यक्षांसह सीबीआयकडून १० जणांना अटक; २० ठिकाणी छापेमारी


नवी दिल्लीः कोट्यवधी रुपयांची लाच घेऊन राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेचे (नॅक) हवे ते मानांकन दिल्याप्रकरणी सीबीआयने नॅक पीअर टीमच्या अध्यक्षांसह १० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये जेएनयूच्या एका प्राध्यापकाचाही समावेश आहे. या लाचखोरी प्रकरणी सीबीआयने १० ठिकाणी छापेमारीही केली आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून ‘नॅक’च्या श्रेयांकनातील लाचखोरीचा काळाकुट्ट चेहराही यानिमित्ताने समोर आला आहे.

नॅक मानांकनातील लाचखोरी प्रकरणी देशभरात २० ठिकाणी छापेमारी केली आहे. चेन्नई, बंगळुरू, विजयवाडा, पालमू, संबलपूर, भोपाळ, बिलासपूर, गौतम बुद्ध नगर आणि नवी दिल्लीत छापेमारी करण्यात आली, असे सीबीआयने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचाः ऐन दिवाळीत आनंदवार्ताः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नॅक मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी!

या छापेमारीत ३७ लाख रुपये रोख, ६ लेनोव्हा लॅपटॉप, सोन्याची नाणी आणि १ आयफोन १६ प्रो मोबाईल फोनसह अन्य दोषारोपात्मक साहित्य जप्त करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील गुटूंरस्थित कोनेरू लक्ष्मैय्या शैक्षणिक प्रतिष्ठानने (केएलईएफ) नॅकच्या मूल्यांकनात A++ मानांकन मिळवण्यासाठी नॅकच्या पीअर टीमच्या सदस्यांना सोने, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि लॅपटॉपच्या स्वरुपात लाच दिली, असे सीबीआयने म्हटले आहे.

नॅक मानांकनातील या लाचखोरी प्रकरणी सीबीआयने सर्व ऑपरेशन राबवले आणि गुटूंरस्थित कोनेरू लक्ष्मैय्या शैक्षणिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी पीअर टीमच्या सदस्यांना रोख रक्कम, सोने, मोबाईल फोन आणि लॅपटॉपच्या स्वरुपात दिलेले ‘अवाजवी लाभ’ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असेही सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआयने १४ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

हेही वाचाः नॅक मूल्यांकनाची जटील प्रक्रिया सोपी आणि परवडणारी कराः उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र

गुटूंरस्थित कोनेरू लक्ष्मैय्या शैक्षणिक प्रतिष्ठानच्या (केएलईएफ) वतीने केएल यूनिव्हर्सिटी चालवली जाते. सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये केएल यूनिर्व्हसिटीचे कुलगुरू जी.पी. सारथी वर्मा, केएलईएएफचे उपाध्यक्ष कोनेरू राजा हारीन आणि केएल यूनिर्व्हसिटीच्या हैदराबाद कॅम्पसचे संचालक ए. रामकृष्ण यांच्यासह नॅक पीअर टीमच्या सहा सदस्यांचा समावेश आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे नॅक मानांकनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!