लखनऊः प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज बुधवारी पहाटे संगम घाटावर चेंगराचेंगरी होऊन किमान १० ते १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. मौनी आमावस्येनिमित्त शाही स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीचे नीट व्यवस्थापन न झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आज बुधवारी पहाटे प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात दुसरे शाही स्नान होते. या शाही स्नानासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्यामुळे लावण्यात आलेले पोलिसांचे बॅरिकेड्स तुटले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक जखमी झाले. या चेंगराचेंगरीमुळे अनेक कुटुंबे एकमेकांपासून विलग झाली आहेत.
घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या असून जखमींच्या महाकुंभच्या सेक्टर २ मधील तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चेंगराचेंगरीनंतर आजचे अमृत स्ना रद्द करण्यात आल्याचे आखाडा परिषदेने जाहीर केले आहे.
या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या आमच्याकडे नाही, असे कुंभमेळ्यातील विशेष कर्तव्यावरील अधिकारी आकांक्षा राणा यांनी सांगितले. भाविकांना संगम घाटावर न जाता इतर घाटावर जाऊन स्नान करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
या चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेने आजचे अमृत स्नान रद्द केले आहे. परंतु अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी चेंगराचेंगरीनंतर गर्दी कमी झाल्यानंतर आखाडे नियोजनानुसार स्नान करतील, असे म्हटले आहे. पहाटे कोट्यवधी लोक आले. आम्ही बुधवारी पहाटेचे शाही स्नान स्थगित करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता गर्दी कमी झाली आहे. ज्या ठिकाणी आम्हाला पवित्र स्नान करायचे होते, ती जागा मोकळी केली जात आहे. आम्ही पवित्र स्नान करू. तेथे स्नान होईल. सर्व आखाडे कोणतीही मोठी मिरवणूक काढणार नाहीत, असे पुरी म्हणाले.
चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तत्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आणि केंद्र सरकारकडून शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
परिस्थिती नियंत्रणात
संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण घटनास्थळी प्रशासन सज्ज आहे. रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यावेळी बॅरिकेड्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासन सातत्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी ६ वाजेपासून घाटावर गर्दी वाढत गेली, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.