
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर २०२४ मध्ये घेतलेल्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेत (PET-2024) अनियमितता झाल्याचे आक्षेप अनेक परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा झाल्यानंतरच नोंदवलेले असतानाच या आक्षेपांना बळकटी देणारे पुरावेच न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. ‘ग्रिव्हन्स’मध्ये समाजकार्य विषयातील ६३ हून अधिक परीक्षार्थ्यांच्या गुणात ८ ते २४ गुणांची आश्चर्यकारक वाढ झाली आहे. काही परीक्षार्थ्यांना तब्बल दुप्पट गुणवाढीचे ‘गिफ्ट’ मिळाल्यामुळे पीएच.डी. प्रवेशाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेलेले जवळपास ३९ परीक्षार्थी पीएच. डी. प्रवेश प्रक्रियेच्या प्रवाहात आले आहेत. त्यामुळे पेट-२०२४ च्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ४ जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवर ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट-२०२४ परीक्षा घेतली होती. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मान्यव्यविद्या शाखा, आंतरविद्याशाखा व वाणिज्य विद्याशाखा अशा चार विद्याशाखांमध्ये एकूण ४४ विषयांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ९ हजार १६६ विद्यार्थी बसले होते. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
पेट-२०२४ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठाने परीक्षार्थ्यांना निकालावर आक्षेप नोंदवण्यासाठी PET2024-RESULT GRIVIENCE सुविधा दिली होती. त्यानुसार १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निकालावर आक्षेप नोंदवले होते. प्रारंभी ग्रिव्हन्समध्ये फक्त तांत्रिक बाबींचाच विचार केला जाईल, ओएमआर उत्तरपत्रिकेद्वारे ही परीक्षा घेण्यात आल्यामुळे गुणांच्या बाबतीतले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु ग्रिव्हन्स समितीच्या बैठकीनंतर समाजकार्य विषयातील पेट-२०२४ च्या निकालात जे फेरफार करून नव्याने निकाल जाहीर करण्यात आले, ते डोळे विस्फारणारे आहेत.
समाजकार्य विषयातील पीएच.डी.साठी प्रवेशासाठीच्या पेट परीक्षेला सुमारे साडेचारशे परीक्षार्थी बसले होते. त्यातील अनेक विद्यार्थी पहिल्याच निकालात पात्र ठरले तर अपात्र ठरलेल्या परीक्षार्थ्यांनी ग्रिव्हन्समध्ये धाव घेत निकालावर आक्षेप नोंदवले. ग्रिव्हन्स कमिटीच्या बैठकीनंतर विद्यापीठ प्रशासनाने जे निकाल जाहीर केले आहेत, त्यात अनेक विद्यार्थ्यांच्या गुणात आश्चर्यकारक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. न्यूजटाऊनने जाहीर झालेला मूळ निकाल आणि ग्रिव्हन्स समितीच्या बैठकीनंतर जाहीर झालेल्या निकालाचे विश्लेषण केले असता अनेक विद्यार्थ्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या गुणात कमालीची तफावत नोंदवली गेली आहे.
ही काही घ्या उदाहरणे
- बैठक क्रमांक 2001900524251079 या परीक्षार्थ्याला मूळ निकालात फक्त ३८ गुण होते. ग्रिव्हन्समध्ये त्याला ५४ गुण मिळाले आहेत. आधीचे गुण आणि नंतरच्या गुणातील तफावत तब्बल १६ गुणांची आहे.
- बैठक क्रमांक 2001900524251099 या परीक्षार्थ्याला मूळ निकालात फक्त ४२ गुण होते. ग्रिव्हन्सनंतर त्याला ५८ गुण देण्यात आले आहेत. त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या गुणांतील तफावत १६ गुणांची आहे.
- बैठक क्रमांक 2001900524251004 या परीक्षार्थ्याला मूळ निकालात ४४ गुण होते. ग्रिव्हन्सनंतर त्याला ५८ गुण मिळाले. त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या गुणांत १४ गुणांची तफावत आहे.
- बैठक क्रमांक 2001900524251042 या परीक्षार्थ्याला मूळ निकालात ४२ गुण होते. ग्रिव्हन्सनंतर त्याला ५४ गुण मिळाले आहेत. त्याचे आधीचे गुण आणि ग्रिव्हन्सनंतरच्या गुणांत १२ गुणांची तफावत आहे.
- बैठक क्रमांक 2001900524251109 या परीक्षार्थ्याला मूळ निकालात ४२ गुण मिळाले होते. ग्रिव्हन्सनंतर त्याला ६० गुण देण्यात आले आहेत. त्याच्या आधीच्या गुणात आणि नंतरच्या गुणात १८ गुणांची तफावत आहे.
- बैठक क्रमांक 2001900524251129 या परीक्षार्थ्याला आधीच्या निकालात ५० गुण मिळाले होते. ग्रिव्हन्सनंतर त्याला ७२ गुण मिळाले आहेत. त्याला मिळालेल्या गुणांची तफावत २२ आहे.
- हेही वाचाः यूजीसीच्या किमान निकषांना तिजांलजी देऊन पुणे विद्यापीठानेही पाठवले १९७ एमफिल अर्हताधारक प्राध्यापकांचे नेट/सेटमधून सूट मिळवण्यासाठीचे प्रस्ताव
- पेट परीक्षेसाठी सर्वसाधारण परीक्षार्थ्यांसाठी ५० टक्के गुणांचा तर आरक्षित प्रवर्गासाठी ४५ गुणांचा कटऑफ ठेवण्यात आला होता. म्हणजे यातील 2001900524251129 या बैठक क्रमांकाचा परीक्षार्थी सोडला तर उर्वरित पाचही परीक्षार्थी पीएचडी प्रवेश प्रक्रियेच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले होते. आता ग्रिव्हन्सच्या लाभानंतर ते पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेच्या प्रवाहात आले आहेत.
- विशेष म्हणजे 2001900524254011 या बैठक क्रमांकाच्या परीक्षार्थ्याच्या बैठक क्रमांकाचा आधीच्या मूळ निकालात समावेशच नाही. ग्रिव्हन्सनंतरच्या निकालात त्याला ५० गुण देण्यात आले आहेत.
मानवरहित उत्तरपत्रिका तपासणी मग एवढी तफावत कशी?
पेट-२०२४ ही निर्धोक आणि निःपक्षपातीपणे व्हावी म्हणून उत्तरपत्रिकांच्या तपासणीत मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी या परीक्षेसाठी ओएमआर म्हणजेच ऑप्टिकल मार्क रिकग्निशन उत्तरपत्रिका पुरवण्यात आल्या होत्या. ओएमआर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणाऱ्याला प्रणालीला आन्सर कीचा डेटा फिड केला जातो. त्या आन्सर कीच्या आधारे ओएमआर प्रणाली उत्तरपत्रिकांचे अचूक स्कॅनिंग करून गुणदान करते. पेट-२०२४ च्या उत्तरपत्रिकांची तपासणी करून ओमएमआर प्रणालीद्वारे दिलेले गुण आणि ग्रिव्हन्सच्या बैठकीत मानवी हस्तक्षेपानंतर दिलेल्या गुणांत एवढी मोठी तफावत येतेच कशी? असा मुख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
एखाद्या विद्यार्थ्याने उत्तराचा पर्याय नीट डार्क केला नसेल, त्यामुळे त्याच्या त्या उत्तराचे ओमएमआरद्वारे स्कॅनिंग होऊन गुण दिले गेले नसतील तर अशा एखाद दुसऱ्या प्रश्नासाठी ग्रिव्हन्स समितीने छानणी करून गुण दिले तर ते समजण्यासारखे आहे. परंतु ओएमआर आणि ग्रिव्हन्सच्या तपासणीत तब्बल १४ ते २२ गुणांची तफावत कशी? असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
…मग एवढी तफावत अन्य विद्याशाखांत का नाही?
विद्यापीठ प्रशासनाने पेट २०२४ च्या उत्तरपत्रिका तपासणीची जबाबदारी ज्या एजन्सीकडे सोपवली होती, त्या एजन्सीची ओएमआर यंत्रणा सदोष होती, असे काही क्षणापुरते ग्राह्य धरले तर समाजकार्य विषयात ज्याप्रमाणे बंपर तफावत आढळून आली, तशीच तफावत अन्य विषयाच्या गुणदानातही आढळून यायला हवी होती. परंतु न्यूजटाऊनच्या पडताळणीत तसे आढळून आलेले नाही. विद्याशाखा निहाय ग्रिव्हन्सची प्रकरणे आणि त्यांनी दिलेल्या निकालाच्या आकडेवारीवरून हेच आढळून आले आहे. ही पहा उदाहरणे
मानव्यविद्या शाखा
- अर्थशास्त्र विषयाच्या १४ परीक्षार्थ्यांनी ग्रिव्हन्स दाखल केले होते. त्यापैकी पाच परीक्षार्थ्यांच्या गुणात प्रत्येक २ गुणांची वाढ झाली आहे.
- इंग्रजी विषयाच्या १७ परीक्षार्थ्यांनी ग्रिव्हन्स दाखल केले होते. त्यापैकी एकाही विद्यार्थ्याचा एकही गुण वाढलेला नाही.
- भूगोल विषयात ग्रिव्हन्स दाखल केलेल्या ६ पैकी एकाही परीक्षार्थ्याच्या गुणात कोणताही बदल झालेला नाही.
- हिंदी विषयाची ग्रिव्हन्स समितीसमोर १३ प्रकरणे आली होती. त्यापैकी फक्त एका परीक्षार्थ्याच्या गुणात २ गुणांची वाढ झालेली आहे.
- इतिहास विषयात दाखल करण्यात आलेल्या १६ ग्रिव्हन्सपैकी एकाही परीक्षार्थ्याच्या गुणात कोणताही बदल झालेला नाही. विधी विषयात दाखल झालेल्या १२ ग्रिव्हन्सपैकी फक्त एका परीक्षार्थ्याच्या गुणात २ दोन गुणांची वाढ झाली आहे.
- मराठी विषयात एकूण २१ ग्रिव्हन्स दाखल करण्यात आले होते. त्यापैकी फक्त एका परीक्षार्थ्याच्या गुणात दोन गुणांची वाढ झालेली आहे. राज्यशास्त्र विषयातही २७ ग्रिव्हन्सपैकी फक्त दोन परीक्षार्थ्यांचे दोन-दोन गुण वाढले आहेत.
- सामान्य प्रशासन, समाजशास्त्र या विषयात कोणाच्या गुणात बदल झालेला नाही.
आंतरविद्या शाखा
समाज कार्य हा विषय आंतरविद्या शाखेअंतर्गत येतो. नाट्यशास्त्र, शिक्षण, ग्रंथालय व माहितीशास्त्र, शारीरिक शिक्षण या विषयांचाही त्यात समावेश होतो. समाजकार्य हा विषय वगळता आंतरविद्या शाखेतील उर्वरित कोणत्याही विषयातील एकाही परीक्षार्थ्यांच्या गुणात कोणताही बदल झालेला नाही. मग समाजकार्य विषयातच ओएमआरद्वारे दिलेले गुण आणि ग्रिव्हन्स समितीने दिले गुण यात एवढी मोठी तफावत कशी? हा मोठाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोणाचे वाढले किती ‘सोशल वर्क’?
बैठक क्रमांक | आधीचे गुण | वाढलेले गुण | फरक |
2001900524251079 | ३८ | ५४ | १६ |
2001900524251099 | ४२ | ५८ | १६ |
2001900524251004 | ४४ | ५८ | १४ |
2001900524251042 | ४२ | ५४ | १२ |
2001900524251046 | ४२ | ५४ | १२ |
2001900524251109 | ४२ | ६० | १८ |
2001900524251057 | ४६ | ६४ | १८ |
2001900524251129 | ५० | ७२ | २२ |
2001900524251110 | ४० | ५४ | १४ |
2001900524251123 | ५४ | ७० | १६ |
2001900524251133 | ४० | ५८ | १८ |
2001900524251145 | ३४ | ५२ | १८ |
2001900524251157 | ३८ | ५० | १२ |
2001900524251107 | ४४ | ४८ | ४ |
2001900524251164 | ३६ | ४६ | १० |
2001900524251172 | ४२ | ६२ | २० |
2001900524251173 | ६४ | ८४ | २० |
2001900524251060 | ३६ | ४८ | १२ |
2001900524251061 | ३२ | ४६ | १४ |
2001900524251068 | ३८ | ४८ | १० |
2001900524251191 | ४२ | ५२ | १० |
2001900524251202 | ३६ | ५२ | १६ |
2001900524251211 | ३४ | ४८ | १४ |
2001900524251213 | ४४ | ५२ | ८ |
2001900524251232 | ३४ | ४८ | १६ |
2001900524251251 | ३८ | ४६ | ८ |
2001900524251271 | ३४ | ४६ | १२ |
2001900524251277 | ३६ | ४६ | १० |
2001900524251288 | ४० | ४८ | ८ |
2001900524251297 | ३६ | ४६ | १० |
2001900524251316 | ४० | ४८ | ८ |
2001900524251317 | ३६ | ५० | १४ |
2001900524251342 | ४२ | ५४ | १२ |
2001900524251344 | ६४ | ८४ | २० |
2001900524251386 | ७२ | ९४ | २२ |
2001900524251388 | ६४ | ७८ | १४ |
2001900524251396 | ३२ | ४८ | १६ |
2001900524251404 | ३८ | ५० | १२ |
2001900524252073 | ३४ | ५० | १६ |
2001900524253006 | १६ | ४० | २४ |
2001900524253007 | २२ | ४२ | २० |
2001900524253009 | १८ | ४२ | २४ |
2001900524253032 | २२ | ४४ | २२ |
