मुंबई: राज्यातील चार चाकी वाहनधारकांना एक एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
१ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे. फास्टॅग कार्यरत नसेल तर वाहनधारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा क्यूआर कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल.
राज्यात एमएसआरडीसीच्या अखत्यारित ५० टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे २३ टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.