दाढी-कटिंगही महागणार, हेअर सलून आणि ब्यूटी पार्लरच्या दरात २० ते ३० टक्के वाढ; १ जानेवारीपासून होणार नवीन दरवाढ लागू!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  महागाईच्या झळा प्रत्येक क्षेत्राला जाणवत असताना आता सलून व ब्यूटी पार्लरच्या सेवांचा खर्चही वाढणार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने हेअर सलून आणि ब्यूटी पार्लरच्या दरात २० ते ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन दरांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२५ पासून करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांनी सांगितले.

मागील काही महिन्यांपासून देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कच्च्या मालाच्या दरासह इंधन दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. सलून आणि ब्युटी पार्लरसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रोफे शनल टॅक्स, दुकानांचे भाडे, वीजबील, कारागीरांचा पगार आदींसारख्या आर्थिक विवंचनेत सलून व्यावसायिक अडकला आहे. दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणी सलून व्यावसायिकांकडून करण्यात येत होती.

सलून व्यावसायाशी निगडीत सर्वच घटकांमध्ये दरवाढ झाल्याने कमी दरात ग्राहकांना सेवा पुरवणे व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. विविध प्रकारच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने १ जानेवारी २०२५ पासून हेअर सलून व ब्यूटी पार्लरच्या दरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दरवाढीचा निर्णय राज्यातील शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही लागू असणार आहे.

महागाई आणि दरात ताळमेळ बसेना

कच्चा माल, वीज, पाणी, जागा भाडे तसेच कामगारांचे वेतन यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महागाई व सध्याचे सलूनचे दर यात ताळमेळ बसत नव्हते. महागाईमुळे होणारे खर्च आणि स्पर्धात्मक बाजारात टिकण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष विष्णू वखरे यांनी केले आहे.

ग्रामीण व शहरी भागासाठी दरवाढ वेगवेगळी

महाराष्ट्रात विविध भागात असलेल्या सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांच्या दरानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने इंधन दरातही वाढ झाली आहे. ज्याचा फटका सलून व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून २० ते ३० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळी दरवाढ असणार असल्याचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सरचिटणीस दिलीप अनर्थे यांनी सांगितले.

असे असतील वाढीचे दर

  • हेअर कट १५ ते २० टक्के (ग्रामीण भाग),  २० ते ३० टक्के (शहरी भाग).
  • दाढी १५ ते २० टक्के (ग्रामीण भाग),  २० ते ३० टक्के (शहरी भाग).
  • क्लिन अप, फेशियल, मसाज २० टक्के (ग्रामीण भाग),  ३० टक्के (शहरी भाग).
  • स्मुथनिंग,  हेअर ट्रिटमेंट, हेअर कलर २० टक्के (ग्रामीण भाग),  ३० टक्के (शहरी भाग).
  • हेड मसाज, मेनिक्यूअर, पेडिक्यूअर २० टक्के (ग्रामीण भाग),  ३० टक्के (शहरी भाग).
  • विविध प्रकारचे मेकअप २० टक्के (ग्रामीण भाग),  ३० टक्के (शहरी भाग).
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!