अजित पवारांची प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली १ हजार कोटींहून अधिक किंमतीची मालमत्ता मुक्त


नवी दिल्ली/मुंबईः  महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्याच्या काही तासांनंतरच त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्तिकर विभागाने (इन्कम टॅक्स) २०२१ मध्ये जप्त केलेली १ हजार कोटींहून जास्तीची मालमत्ता दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधीकरणाने मुक्त केली आहे.

बेनामी मालमत्ता प्रकरणी प्राप्तिकर विभागाने अजित पवार यांच्या कुटुंबीयांशी संबंधित १ हजार कोटींहून जास्तीच्या किंमतीची मालमत्ता ६ डिसेंबर २०२१ रोजी जप्त केली होती. शुक्रवारी बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधीकरणाने ही मालमत्ता मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांना दिलासा मिळाला आहे.

 प्राप्तिकर विभागाने अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर २०२१ मध्ये छापे टाकले होते. या छाप्यात प्राप्तिकर विभागाने काही कागदपत्रे आणि मालमत्ता जप्त केल्या होत्या. या कारवाईत मुंबईसह महाराष्ट्रातील अजित पवारांचे नातेवाईक, बहिणी आणि जवळच्या सहकाऱ्यांसह त्यांच्याशी संबंधित लोकांची निवासस्थाने आणि कार्यालयांची झाडाझडती घेण्यात आली होती.

या कारवाईला अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायाधिकरणात आव्हान दिले होते. न्यायाधिकरणाने पुराव्याअभावी प्राप्तिकर विभागाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. जप्त केलेली एकही मालमत्ता थेट अजित पवारांच्या नावावर नसल्याचे सांगत हे दावे फेटाळण्यात आले आहेत.

राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया

दरम्यान, बेनामी व्यवहार प्रतिबंधक अपीलीय प्राधिकरणाने अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिल्यानंतर या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून टिकास्त्र सोडले आहे.

‘कालच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आज लगेचच अजित पवारांची प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सहीसलामत त्यांना परत केली. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवार यांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता, त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झाले आहे. हा लोकशाही बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधी सुद्धा लढवला गेला आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

भावना गवळी, यशवंत जाधव, रविंद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिंमतीने हा लढा दिला होता! या शूरवीरांनी मोठ्या ताकदीने हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भाजपने सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मतद केली, त्या भाजपचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि आभारसुद्धा’ अशी खोचक टीका त्यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर करून केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!