छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने १०४- सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा येथे १९ किलो सोने व ३७ किलो चांदी जप्त करण्यात आली. एका खाजगी वाहनातून ही वाहतुक होत होती. जप्त केलेल्या ऐवजाची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे,असे आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवले आहे.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत आचारसंहिता अंमलबजावणीसाठी स्थिर सर्व्हेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गुरुवारी सायंकाळी सिल्लोड मतदार संघात छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर निल्लोड फाटा येथे जळगावकडे जात असलेल्या एमएच १२ व्हीटी ८६२९ या वाहनाची तपासणी केली असता त्यात १९ किलो सोने व ३७ किलो चांदीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
हा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत १९ कोटी रुपये आहे. हा ऐवज व वाहन सिटी पोलीस स्टेशन सिल्लोड यांना सुपूर्द करण्यात आला असून पुढील कारवाई वस्तू व सेवा कर विभागामार्फत करण्यात येत आहे, असे सहाय्यक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळविले आहे.
जप्त करण्यात आलेले हे सोने-चांदी जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याचे कळते. हे सोने-चांदी जीएसटी विभागाच्या हवाली करण्यात आले आहे. सोने-चांदी खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची माहिती घेण्यासाठी जीएसटी विभागाने संबंधितांना बोलावून घेतले आहे. त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.