छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या पहिल्याच यादीत उमेदवारी मिळवलेले किशनचंद तनवाणी यांना निवडणुकीतून माघार घेतली आहे. तनवाणी यांनी ऐनवेळी पक्षाला तिकिट परत केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे तनवाणी यांनी म्हटले आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून एमआयएमने नासीर सिद्दिकी यांना तिकिट दिले आहे.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल हे विद्यमान आमदार आहेत. एकनाथ शिंदेंनी प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिंदेसेना, एमआयएम आणि शिवसेना (उबाठा) अशी तिरंगी लढत होणार होती. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एकच दिवस शिल्लक राहिलेला असताना शिवसेना (उबाठा) उमेदवार किशनचंद तनवाणी यांना निवडणुकीतून माघार घेतली आहे.
उद्धव साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती. पण २०१४ सारखी परिस्थिती पुन्हा नको म्हणून मी माघार घेत आहे. साहेबांना मी तशी विनंती केली आहे, असे किशनचंद तनवाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देता का? असे पत्रकारांनी विचारले असता तनवाणी म्हणाले की, मी त्यांना पाठिंबा देत नाही. पण २०१४ ची पुनरावृत्ती होऊन एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मी माघार घेत आहे, असे तनवाणी म्हणाले.
२०१४ मध्ये मी आणि प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक लढवली होती. तेव्हा एमआयएमच्या उमेदवाराचा विजय झाला होता. २०१९ मध्ये प्रदीप माझ्याकडे आला होता. तेव्हा मी भाजपचा जिल्हाध्यक्ष होतो. मी त्याला पाठिंबा दिला आणि तो निवडून आला. आता पुन्हा एकदा आम्हा दोघांसह एमआयएमचा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे १० वर्षांपूर्वीच्या निकालाची पुनरावृत्ती होऊ शकते. ती होऊ नये म्हणून मी माघार घेतली, असे तनवाणी म्हणाले.