संगमनेरः लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. जवळपास एक मिनिट ते जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद बोलले. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानानंतर संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला असून काही ठिकाणी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.
लोकसभेला पराभूत झालेले सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद भाषेत अश्लाघ्य वक्तव्य केले.
‘भाऊसाहेब थोरात यांची नात… ती बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाही तर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे. त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्यात माहिती आहेत,’ असे वसंतराव देशमुख म्हणाले.
वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत सभास्थळी धडक दिली. काही महिलांनी थेट स्टेजवर चढून ठिय्या मांडला आणि सभा बंद पाडली.
वसंतराव देशमुख यांनी केलेल्या या आक्षेपार्ह विधानानंतर संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सभा आटोपून परत जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवण्यात आल्या. त्यांची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे.
आक्रमक झालेले काँग्रेस कार्यकर्ते आणि महिलांनी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रात्री १० वाजेपासून पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर पहाटेच्या सुमारास वसंतराव देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री थोरात यांनी पूर्ण रात्र पोलिस ठाण्यासमोर बसून ठिय्या आंदोलन केले.
…हे भाजपचे संस्कारः खा. सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ विधान केले. भरसभेत आपल्या मुलीच्या वयाच्या नेत्यावर अशा पद्धतीने गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली,ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विशेष म्हणजे माजी खासदार सुजय विखे देखील या सभेला उपस्थित होते. त्यांनी देखील या विधानाचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. शिवरायांच्या ज्या राज्यात महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येत होती. त्या राज्यात महिलांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ भाषा वापरण्यात येत आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत. या विधानाचा तीव्र निषेध. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो ही प्रार्थना, असे सुळे यांनी म्हटले आहे.