‘लाडकी बहीण योजना’ हा केवळ मते मिळवण्याचा जुगाडः भाजप आमदाराची खळबळजनक कबुली, पहा व्हिडीओ


नागपूरः ऐनविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील सर्वसामान्य माताभगिनींच्या हितासाठीच आणण्यात आली असल्याचे दावे भाजपसह महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून केले जात असतानाच  भाजपचे कामठी मौदाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी मात्र ही सगळी भानगड आम्ही मतांसाठीच केली. लाडक्या बहिणीने कमळाला मते द्यावीत म्हणूनच हा जुगाड केला, अशी स्पष्ट कबुली देत या योजनेमागचा अंतस्थ हेतू सांगून खळबळ उडवून दिली आहे. आ. सावरकर यांच्या या वक्तव्यामुळे भाजपसह महायुती चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे तर विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. राज्याच्या राजकारणात सध्या या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात देण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दावे महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत तर ही योजना म्हणजे केवळ मतांचे राजकारण असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच खुद्द भाजपच्या आमदारानेच या योजनेमागचा अंतस्थ हेतू सांगून खळबळ उडवून दिली आहे.

भाजपचे कामठी-मौदाचे आमदार टेकचंद सावकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात बोलताना आमदार सावरकर यांनी ‘माझी लाडकी बहीण योजना’ का आणली? या मागचे महायुतीचे सगळे गणितच सांगून टाकले आहे. हिंदीत केलेल्या भाषणात ते म्हणाले, ‘हम इतना बडा भानगड कायके लिये किये बताओ बरं आप?  इमानदारी से अंतःकरण से बताओ के हमने ये भानगड कायके लिये किया?  के जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आयेगी, तो मेरी ये लाडली बहना कमल को वोट देगी। इस के लिए तो ये जुगाड किया हमने। ये सब लोक झुठ (मंचावर बसलेले) बोले होंगे, मैं सही बोल रहा। मेरी बात सही है क्या नही? नही तो बताने का येक अन करने का येक, हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ते है क्या?,’ असे सावरकर या भाषणात बोलत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. पहा व्हिडीओ

आ. सावरकर यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद असाः

‘आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली सांगा बरं तुम्ही?  इमानदारीने, अंतःकरणातून सांगा की आम्ही ही भानगड कशासाठी केली? की ज्या दिवशी तुमच्या घरापुढे मतपेटी येईल, तेव्हा माझ्या या लाडक्या बहिणी कमळाला मत देतील, याचसाठी तर आम्ही हा जुगाड केला आहे. हे सगळे लोक (मंचावर बसलेले) खोटे बोलले असतील. मात्र मी खरं बोलतोय. माझे बोलणे खरे आहे की नाही? नाहीतर सांगायचे एक आणि आणि करायचे एक, आम्ही काय रामदेव बाबाचे कार्यकर्ते आहोत का?’

मतांचा दुष्काळ संपवण्यासाठीच जुगाडः वडेट्टीवार

काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आ. टेकचंद सावरकर यांच्या वक्तव्यावरून महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार यांनी एक्सवर आ. सावरकर यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत महायुतीवर हल्लाबोल केला आहे. ‘अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केले की, महायुतीतील सर्व नेते खोटे बोलतात. लाडकी बहीण योजना मताभगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे,’ असे टिकास्त्र वडेट्टीवार यांनी सोडले आहे.

अमित शहांचा दौरा अन् आ. सावरकरांचे वक्तव्य

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी त्यांनी नागपूरचा दौरा केला. शहा यांच्या दौऱ्याच्या दिवशीच सोशल मीडियावर आ. सावरकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपला निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्व तयारी करा, एक दिलाने निवडणुकीला सामोरे जा, असे आदेश अमित शहा यांनी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले असतानाच आ. सावरकर यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!