बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिस चकमकीत ठार; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, विरोधक म्हणालेः हे फेक एन्काऊंटर!


बदलापूर/मुंबईः संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. तुरुंगातून पोलिस कोठडीत नेले जात असताना अक्षयने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेऊन गोळीबार केला. या गोळीबारात एक अधिकारी जखमी झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय ठार झाला.

ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने आज अक्षय शिंदेला तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतले होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घटनास्थळी पाहणी करण्यासाठी त्याला घेऊन जात असताना मुंब्रा बाह्यवळण मार्गावर पोहोचताच अक्षय शिंदेने पोलिसांजवळील बंदूक हिसकावली आणि त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एपीआय निलेश मोरे हे गंभीर जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही त्याच्यावर गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदे जखमी झाला. या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासून अक्षय शिंदेला मृत घोषित केले. हा साराच प्रकार पोलिसांच्या वाहनातच घडला.

 अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बदलापुरात रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली होती. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासाठी एसआयटी नेमली होती. एसआयटीने तपास करून अक्षय शिंदेविरुद्ध कल्याणच्या न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते.

हे प्रकरण सुरू असतानाच अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सोमवारी  साडेपाच वाजेच्या सुमारास तळोजा तुरूंगातून ताब्यात घेतले होते. साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिस त्याला घेऊन मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आले असता अक्षय पोलिस वाहनात शेजारी बसलेल्या पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी लागून एपीआय निलेश मोरे जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या. यात अक्षय जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश

या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या एन्काऊंटरचा घटनाक्रम सांगताना फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी मुख्य आरोपीवर गोळीबार केला. अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्या गुन्ह्यात पोलिस अक्षय शिंदेला चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी चालवली. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. पुढे त्याला दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला, असे फडणवीस म्हणाले.

…हे फेक एन्काऊंटरः विरोधकांचे टिकास्त्र

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बी चकमक बनावट असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

अक्षयचा खून केला का?: चव्हाण- महाराष्ट्र पोलिसांची एक प्रतिमा होती. सक्षम आणि कार्यसक्षम यंत्रणा म्हणून पोलिसांची ओळख होती. पोलिस बंदोबस्तात माणूस मरतो मग त्याचा खून केला का?  त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला का? असे सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत. कायदा व सुव्यवस्थेवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

अक्षय शिंदे हिंस्त्र होता का?: अंधारे- हैदराबादच्या बलात्कार प्रकरणात ४ आरोपींचा अशाच प्रकारे एन्काऊंटर करण्यात आला होता. तसेच अक्षय शिंदेच्या प्रकरणात घडले आहे. पोलिसांकडून स्वरसक्षणासाठी बनाव केला. त्यांनी केलेला स्वरक्षणाचा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. अक्षय शिंदे हिंस्त्र होता का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

…म्हणून एन्काऊंटर घडवला का?- पाटीलः पोलिसांचे काय चालले आहे? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. प्रकरण पुढे जाऊ नये म्हणून एन्काऊंटर घडवून आणला का? याची पुन्हा चौकशी करावी लागेल. एखाद्या आरोपीच्या हाती बंदूक लागणे चूक आहे, असे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

 पोलिस इतके बेसावध कसे?- वडेट्टीवारः याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे. अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय शिदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी मिळाली? पोलिस इतके बेसावध असू शकतात? असे सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत. बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी संबंधित असताना संस्थाचालकावर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी झाडून घेतो, हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासूनच विश्वास नाही. आमची मागणी आहे की आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!