गडचिरोलीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज करण्यासाठी राज्यभरातील महिलांनी गर्दी केली आहे. परंतु या योजनेचे अर्ज भरणाऱ्या महिलांसाठी मोठी बातमी आहे. ज्या महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत भरले आहेत, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा एकत्रित लाभ मिळणार आहे. परंतु ३१ ऑगस्टची तारीख चुकवणाऱ्या महिलांना मात्र या दोन महिन्यांच्या लाभाला म्हणजेच ३ हजार रुपयांना मुकावे लागणार आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे बोलताना दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ सप्टेंबरनंतर अर्ज भरून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. यापुढे महिला या योजनेसाठी ज्या महिन्यात या योजनेसाठी नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळेल, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
३१ ऑगस्ट शेवटची तारीख नव्हे, कधीही करा नोंदणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून नोंदणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख नव्हती. ही नाव नोंदणी याहीपुढे कायम राहणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिन्यात नोंदणी केली जाईल, त्याच महिन्यापासून संबंधित महिलांना लाभ मिळेल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
दीडकोटी महिलांच्या खात्यात रक्कम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत राज्यभरातून २ कोटी ४० लाखांपर्यंत अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये, अशी राज्य सरकारची धारणा आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली. १७ ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये याप्रमाणे दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यात सुरूवात झाली. या योजनेअंतर्गत राज्यातील दीडकोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.
४० लाख महिला वेटिंगवर
आधार आणि मोबाइल क्रमांक लिंक नसल्यामुळे ४० ते ४२ लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. आधार-मोबाइल लिंक करण्याचे काम सुरू आहे. ज्या महिलांच्या आधार जोडणीचे काम अपूर्ण आहे, त्या महिलांच्या बँक खात्याशी आधार लिंक झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.