नागपूरः आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेऊन कुलपती तथा राज्यपालांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निलंबित केल्यामुळे या विद्यापीठातील आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार चर्चेचा विषय ठरलेला असतानाच आता याच विद्यापीठातील एका महिला रोखपालाने तब्बल ४४ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वर्षभरापूर्वीच्या एका जुन्या पावतीमुळे या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कनिष्ठ लिपीकपदावर कार्यरत असलेली बबिता नितीन मसराम (वय ४० वर्षे, रा. एसआरपीएफ क्वार्टर्स, हिंगणा) ही महिला विद्यापीठाच्या कॅश काऊंटरवर रोखपाल म्हणून काम करते. या महिलेने आपल्या लॉगइन आयडीवरून मूळ पावत्यांत मॉडिफिकेशन करून हा भ्रष्टाचार केल्याची बाब समोर आली आहे.
विद्यापीठाच्या अभियंता विभागामार्फत एम. के. बल्डर्स यांनी २०२३ मध्ये ३४ हजार १६० रुपयांची पावती सुरक्षा ठेवीच्या परताव्यासाठी जमा केली होती. वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता ही मूळ पावती केवळ ४ हजार १६० रुपयांचीच होती. त्यात बबिता मसराम या महिला रोखपालाच्या लॉगइन आयडीवरून २०२२ मध्ये मॉडिफिकेशन करण्यात आले होते.
मूळ पावतीत मॉडिफिकेशन केल्याची बाब निदर्शास आल्यानंतर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी हरिश पालीवाल यांनी बबिता मसराम हिच्याकडे विचारणा केली असता तिने मूळ पावतीमध्ये चुकून मॉडिफिकेशन झाल्याचे सांगितले आणि मूळ पावतीच्या फरकाची रक्कम ३० हजार रुपये विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा केले.
एका पावतीच्या फरकाची रक्कम जमा केल्यामुळे आपण केलेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घातले जाईल, असे बबिता मसरामला वाटले खरे, परंतु पालीवाल यांना संशय आल्यामुळे त्यांनी तिझ्या लॉगइन आयडीवरून दिलेल्या सर्वच पावत्यांची तपासणी केली. या तपासणीत बबिता मसरामने ४३९ पावत्या मॉडिफाय करून विद्यापीठाला ४४ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठाने बबिता मसराम हिची आणखी चौकशी केली. त्यानंतर पालीवाल यांच्या तक्रारीवरून नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या कॅश काऊंटरचे काम एका सॉफ्टवेअरद्वारे चालते. कॅश काऊंटरवर काम करणाऱ्या रोखपालांना लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिलेले आहेत. या लॉगइनवरून पैसे जमा केल्याची एखादी नोंद चुकली तर त्याच दिवशी त्या नोंदीत बदल करून चूक दुरूस्त करण्याचे अधिकार रोखपालांना दिलेले आहेत.
ही चूक नंतर लक्षात आली तर रोखपालांपेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी पावती मॉडिफाय करून चूक दुरूस्त करू शकतात. बबिता मसराम या महिला रोखपालाने तिच्या कॅश काऊंटरवर जमा झालेल्या पावत्याच मॉडिफाय करून हा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.