छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दुपारी दोन मोर्चे धडकणार आहेत. त्यातील पहिला मोर्चा नेट, सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीचा असून हा मोर्चा बेरोजगारांची वारी, कुलगुरूंच्या दारी घेऊन जाणार आहे. दुसरा मोर्चा एमफुक्टो प्राध्यापक संघटनेचा आहे.
नेट, सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती आज दुपारी तीन वाजता ‘बेरोजगारांची वारी, कुलगुरूंच्या दारी’ घेऊन धडकणार आहे. केंद्र शासन व यूजीसीच्या निर्देशांप्रमाणे शंभर टक्के प्राध्यापक भरती करा, सीएचबी पद्धत कायमस्वरुपी बंद करून समान काम समान वेतन द्या, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती करा, अशा मागण्या घेऊन ही बेरोजगारांची वारी कुलगुरूंकडे आपले गाऱ्हाणे मांडणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासन या मोर्चाला सुरूवात होईल.
एमफुक्टो या प्राध्यापक संघटनेच्या वतीनेही विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत याच वेळेला मोर्चा काढण्यात येणार आहे. उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानातील तरतुदींमध्ये घरगुती पद्धतीने बदल करून प्राध्यापकांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्याच्या मनमानी कारभाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आज राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठावर एमफुक्टोच्या वतीने मोर्चे काढण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ प्रशासन आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आंदोलनावरून खटके उडत आहेत. आमची परवानगी घेऊनच आंदोलन करा, आम्ही परवानगी नाकारल्यास आंदोलन करता येणार नाही, अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठावर आज दोन मोर्चे धडकत आहेत. त्यामुळे या मोर्चेकऱ्यांबाबत विद्यापीठ प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.