नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने नीट-पीजी परीक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ही परीक्षा रविवारी (११ ऑगस्ट) रोजी होणार आहे. परीक्षा केंद्रांचे वितरण आणि दोन विद्यार्थ्यांच्या गुणांचे सामान्यीकरणाबद्दल चिंता व्यक्त करत या परीक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती फेटाळून लावण्यात आली आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. आम्ही नवीन शैक्षणिक धोरण तयार करू शकत नाही आणि ही काही आदर्श दुनिया नाही, असे सांगत या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. नीट-पीजी परीक्षेच्या अनेक उमेदवारांना अशी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत की, तेथे पोहोचणे त्यांच्यासाठी अत्यंत असुविधेचे आहे. त्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली होती.
हल्ली लोक केवळ परीक्षा स्थगित करण्याची मागणी करतात. परंतु पाच याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही दोन लाख उमेदवारांच्या भविष्याशी खेळू शकत नाही. उमेदवारांनी परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या दोन दिवसआधी आम्ही ही परीक्षा स्थगित करून त्यांच्यासमोर नव्या अडचणी निर्माण करू इच्छित नाही. असे केल्याने त्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे ही परीक्षा नियोजित वेळेत घेतली जावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
परीक्षा केंद्रात दुरूस्ती होईपर्यंत परीक्षेला स्थगितीबरोबरच या याचिकेत उमेदवारांच्या प्रश्नपत्रिकांच्या चार सेटच्या सामान्यीकरण सूत्राचे स्पष्टीकरण देण्यात यावे, म्हणजे मनमानीच्या कोणत्याही शक्यता संपुष्टात आणता येतील, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. ‘तुमचा तर्क आदर्श समाधानावर आधारित आहे. आम्ही एक जटील समाज पहात आहोत,’ असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही याचिका फेटाळताना म्हटले आहे.
११ ऑगस्टलाच होणार परीक्षा
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे येत्या रविवारी (११ ऑगस्ट) देशातील १७० शहरांतील ४१६ परीक्षा केंद्रांवर नीट-पीजी परीक्षा घेतली जाईल. दोन टप्प्यांत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला यावर्षी २ लाख २८ हजार ५४२ परीक्षार्थी आहेत. परीक्षार्थी त्यांची प्रवेशपत्रे ‘एनबीईएमएस’च्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. याआधी ही परीक्षा २३ जून रोजी घेतली जाणार होती. परंतु यूजीसी नेट आणि नीट-यूजी परीक्षेतील अनियमिततेमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.