भाजपच्याच नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार म्हणत अमित शाहांनी अप्रत्यक्षपणे सांगितले पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच!


पुणेः लोकसभा निवडणूक निकालाच्या आकड्यांवरून काहीतरी कसर राहिल्याची भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत आहे. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राहिलेली कसर भरून काढा. पुढील महायुतीचे सरकार भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वात असेल. माझ्या बोलण्याचा नीट अर्थ समजून घ्या, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत जान फुंकण्यासाठी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपचे राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या राज्य अधिवेशनात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक भाषण करून लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे निराश झालेल्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला.

 लोकसभेला बहुमत न मिळाल्याची सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. महाराष्ट्रातील भाजपचे कार्यकर्ते प्रचंड कष्टाळू आणि मेहनती आहेत. त्यांच्या कष्टावर माझा विश्वास आहे.  त्यांच्या कष्टावरच आपण विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवू, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय होणार आहे, हे मला स्पष्ट दिसत आहे, असे अमित शाह म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील कसर विधानसभा निवडणुकीत भरून काढा. महाराष्ट्र विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकवा. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्याच नेतृत्वात महायुतीचे सरकार असेल. माझ्या बोलण्याचा अर्थ नीट समजून घ्या, असे अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी असे वक्तव्य करून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा नव्हे तर भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार स्थापन होते, तेव्हा तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जातो. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम आमच्य महायुतीच्या सरकारने केले आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळाले. जेव्हा शरद पवारांची सत्ता येते, तेव्हा मराठ्यांचे आरक्षण जाते, असा आरोपही अमित शाह यांनी केला आहे.

शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मेरूमणी

अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली. शरद पवार हे भारताच्या राजकरणातील भ्रष्टाचाराचे मेरूमणी आणि मुख्य सरदार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवारांनी केले आहे, असे अमित शाह म्हणाले. काँग्रेसच्या काळात  शरद पवार केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रावर कसा अन्याय झाला, याचा पाढाही अमित शाह यांनी आपल्या भाषणात वाचला. उद्धव ठाकरे हे याकूब मेमनला मदत करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसल्याचा आरोपही शाह यांनी केला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *