मुंबईः अजित पवार यांनी शरद पवारांविरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० पेक्षा जास्त आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा हा दावा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फुसका ठरला. शरद पवार गट आणि दादा गटाने जारी केलेल्या दोन स्वतंत्र व्हीपनंतर अजित पवारांसह फुटून बाहेर पडलेले आणि सत्तेत सामील झालेले नऊ मंत्री आणि केवळ सहा आमदारच सत्ताधारी बाकावर बसलेले दिसले. तर विरोधी बाकावर दादा गटापेक्षा जास्त म्हणजेच नऊ आमदार दिसून आले. त्यामुळे अजित पवारांचे हे बंडही मोडून काढण्यात शरद पवार यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना व्हीप बजावून विरोधी बाकावर बसण्यास सांगितले होते. तर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनीही स्वतंत्र व्हीप बजावून सत्ताधारी बाकावर बसण्याचे फर्मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोडले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार कोणत्या बाकावर बसणार? याबाबतची कमालीची उत्सुकता होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवारांसह नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीसपेक्षा जास्त आमदार आमच्या बाजूने आहेत, असा दावा केला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणते आणि किती आमदार त्यांच्या बाजूने आहेत, हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नव्हते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्माराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील हे मंत्री आणि बबन शिंदे, इंद्रनील नाईक, प्रकाश सोळंके, किरण लहमाटे, सुनिल शेळके आणि सरोज आहेर हे सहा आमदार सत्ताधारी बाकावर बसलेले दिसले. हे एकूण संख्याबळ केवळ १५ होते.
शरद पवार गटाने जारी केलेल्या व्हीपनुसार विरोधी पक्षाच्या बाकावर नऊ आमदार बसलेले दिसले. त्यात जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, सुनिल भुसारा, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, सुमन पाटील, रोहीत पवार आणि मानसिंग नाईक यांचा समावेश आहे. अजित पवार गटाच्या मंत्री झालेल्या नऊ आमदारांविरुद्ध शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आजचे चित्र पाहता शरद पवार गटाच्या बाजूने जास्त आमदार असल्याचे दिसून आले आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाकडे पाठ फिरवली. कोणत्या गटात कोण, हे दिसण्यापेक्षा या आमदारांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेणेच टाळले. त्यामुळे सत्ताधारी बाकावर १५ आमदार दिसले असले तरी या बसणाऱ्या एकूण आमदारांची संख्या किती? हे मात्र स्पष्ट झालेले नाही. सभागृहात जेव्हा एखादे विधेयक मंजुरीसाठी येईल आणि त्यावर मतदान घेतले जाईल, त्यादिवशी व्हीप बजावून आमदारांना विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले जाईल, तेव्हाच कोणाच्या बाजूने किती आमदार? हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.