मॉस्कोः जगाला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण ९/११ च्या हल्ल्याची आठवण करून देणारा हल्ला रशियातील कझान शहरात झाला. रशियाची तिसरी राजधानी अशी ओळख असलेल्या कझान शहरात सहा गगनचुंबी इमारतींवर एकामागोएक ड्रोन हल्ले करण्यात आले. या ड्रोन हल्ल्यात इमारतींचे मोठे नुकसान झाले असून या हल्ल्यात नेमकी किती जिवित हानी झाली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ले चढवणाऱ्या ड्रोनपैकी काही ड्रोन उद्धवस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे.
कझान शहरातील तीन उंच इमारतींवर सिरियल ड्रोन हल्ले (यूएव्ही) करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या दिशेने येणारे किलर ड्रोन (यूएव्ही) हवेत इमारतींवर धडकताना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या सिरियल ड्रोन हल्ल्यांमुळे सोवेत्स्की, किरोव्स्की आणि प्रिव्होल्स्की या तीन जिल्ह्यांतील घरांना आगी लागल्याची माहिती महापौर कार्यालयाने दिली आहे.
कझान शहर रशियाची राजधानी मॉस्कोपासून ७२० किलोमीटर आहे. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने रशियाची वृत्तसंस्था इतारतासच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रशियाची राजधानी मॉस्कोपासून ७२० किलोमीटर अंतरावर असलेल्या कझान शहरातील एका निवासी भागात ड्रोन हल्ला झाला. ८ ड्रोन हल्ल्यांची नोंद झाली आहे. त्यातील ६ ड्रोन हल्ले निवासी इमारतींवर करण्यात आले आहेत.
किलर ड्रोन इमारतींवर धडकल्यामुळे मोठे स्फोट झाले. या हल्ल्यासाठी रशियाने युक्रेनला थेट जबाबदार धरले आहे. हा ड्रोन हल्ला युक्रेनने केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून म्हटले आहे.
रशियाच्या सुरक्षा सेवेशी संबंधीत बाजा टेलिग्राम चॅनलने एक पुष्टी न झालेले व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध केले आहे. या व्हिडीओमध्ये एक ड्रोन एका गगनचुंबी इमारतीवर धडकताना दिसत आहे. हे ड्रोन इमारतीवर धडकल्यानंतर आगीचा मोठा गोळा बाहेर येताना दिसत आहे. दुसरीकडे युक्रेन विरुद्ध लढण्यासाठी रशियाला पाठवण्यात आलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांनी या ड्रोनचा पता लावण्यासाठी आणखी निगराणी चौक्या स्थापन केल्या आहेत, युक्रेनच्या संरक्षणविषयक गुप्तचर सेवेने ही माहिती दिली.