तहव्वूर राणाला भारतात आणले, पण २६/११ च्या अतिरेक्यांना प्रशिक्षण देणाऱ्या बीडच्या अबू जिंदालवरील खटला ६ वर्षांपासूनच लटकलेलाच!


मुंबईः मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर हुसैन राणाचे गुरूवारी अमेरिकेकडून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) राणाला औपचारिक अटक करून दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली. परंतु ज्या व्यक्तीवर २६/११ च्या हल्लेखोरांना हिंदी शिकवल्याचा, हल्ल्याच्यावेळी व्हाइस ओव्हर इंटरनेट लाइनवर सूचना दिल्याचा आरोप आहे आणि जी व्यक्ती या हल्ल्यातील एकमेव कथित भारतीय गुन्हेगार आहे, त्या अबू जिंदाल उर्फ सय्यद जबीउद्दीन अन्सारीवरील खटला सहा वर्षांपासून लटकलेला आहे.

मुंबईमध्ये वकील तहव्वूर राणाविरुद्ध खटला सुरू करण्याची तयारी करत आहेत. राणा हा २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील आरोपी आहे. परंतु या हल्ल्यातील अतिरेक्यांना व्हाइस ओव्हर इंटरनेट लाइनवर प्रशिक्षित केल्याचा आरोप असलेला लष्कर-ए-तोएबाचा हस्तक अबू जिंदाल उर्फ जबीउद्दिन अन्सारीवर मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधामुळे गेल्या सहा वर्षांपासून खटला दाखल होऊ शकलेला नाही. सध्या जबीउद्दिन अन्सारी मुंबईतील तुरुंगात आहे.

जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर निर्णय देत नाही, तोपर्यंत अबू जिंदालवरील खटला पुढे सरकू शकत नाही. २०१२ मध्ये सौदी अरब ते भारत प्रवासादरम्यानचे अबू जिंदाल उर्फ जबीउद्दिन अन्सारीचे दस्तावेज विशेषाधिकार प्राप्त आहेत, असा पोलिसांचा दावा आहे. न्यायालयाने आधी पोलिसांना हे दस्तावेज सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची शेवटची सुनावणी एप्रिल २०१८ मध्ये झाली होती.

वीमा एजंटचा मुलगा आणि चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या जबीउद्दिन अन्सारी जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झाला. त्याने बीडच्या आयटीआयमधून इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमा केला आणि काहीकाळ इलेक्ट्रिशियनचे काम केल्यानंतर त्याने तत्कालीन औरंगाबाद आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जबीउद्दिन अन्सारीने औरंगाबादला पदवीला प्रवेश घेण्यापूर्वी काहीकाळ काम केले. तेव्हापासूनच त्याच्यावर स्टुटंड्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियामध्ये (सीमी) सक्रीय असल्याचा आरोप आहे. नंतर जबीउद्दिन अन्सारी आपला महाविद्यालयीन मित्र फैय्याज जुल्फिकार कागजीसोबत २००५ च्या हिवाळ्यात लष्कर-ए-तोएबाच्या वरिष्ठ कमांडरला भेटण्यासाठी काठमांडूमार्गे कराचीला गेला होता.

भारतामध्ये लष्कर-ए-तोएबाचे कॅडर तयार करण्याचा लष्करचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच जबीउद्दिन अन्सारी आणि फैय्याज जुल्फिकार कागजीची लष्कर-ए-तोएबाच्या वरिष्ठ कमांडरची भेट झाली होती.

तारकेश्वरमधील फलाह-ए-दारैन मदरसामध्ये कार्यरत मौलवी असलम सरदानाच्या नेतृत्वात इस्लामवाद्यांच्या एका छोट्या गटाने गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय नरसंहाराविरुद्धच्या व्यापक लोकक्षोभाचा फायदा घेत संभाव्य जिहादींची भरती सुरू केली होती.

छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) गटातील तीन लोकांपैकी एक फहद हुसैन २००४ मध्ये हिल काका परिसरात भारतीय सैन्याच्या कारवाईत मारला गेला. बीड परिसरातील अन्य दोन लोक निसार आणि असद अन्सारी या दोघांचा ठावठिकाणा अद्यापही लागू शकलेला नाही.

कोल्हापूरचा इरफान मोइनुद्दिन अत्तर हा मे २००६ मध्ये दक्षिण काश्मीरमधील त्राल शहरालगच्या परिसरात झालेल्या गोळीबारात मारला गेला. गुजरातचा अयूब दामरवालाही याचवेळी ठार झाला आणि पीर पंजाल रेंजच्या दक्षिणेला अज्ञात कबरीत त्याला दफन करण्यात आले होते, असे मानले जाते.

जिहादींच्या या नव्या गटाला भारतात मोहीम फत्ते करण्यासाठी लष्कर-ए-तोएबाने १६ असॉल्ट रायफली, ४ हजार राऊंड गोळाबारूद आणि ४३ किलो प्लास्टिक स्फोटके पाठवली होती. ही शस्त्रास्त्रे कॉम्प्यूटर केसमध्ये पॅक करून पाठवण्यात आली होती. परंतु इंटेलिजन्स ब्युरोने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे ९ मे २००६ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वेरूळजवळ पोलिसांनी धडक मोहीम राबवत ही शस्त्रास्त्रे जप्त केली होती. ही शस्त्रास्त्रे घेऊन जाणाऱ्या कारसोबतच दुसऱ्या कारमध्ये असलेला जबीउद्दिन अन्सारी पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

वेरूळहून निसटलेला जबीउद्दिन अन्सारी नंतर रेल्वेने कोलकात्याला गेला. तेथे त्याने छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) आपल्या इस्लामी समूहाच्या मित्रांकडे आश्रय घेतला. नंतर तो सीमा ओलांडून बांग्लादेशला गेला. तेथे लष्कर-ए-तोएबाच्या एका हस्तकाने त्याला बनावट पासपोर्ट आणि पाकिस्तानी व्हिसा उपलब्ध करून दिला. मग तो कराचीला गेला. तेथे मुजफ्फराबादजवळील लष्कर-ए-तोएबाच्या एका छावणीत तो सहा महिने राहिला.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या काही दिवस आधी जबीउद्दिन अन्सारीला थट्टा या छोट्याशा शहराजवळील एका बैठकीत बोलावण्यात आले. या बैठकीत जबीउद्दिन अन्सारी लष्कर-ए-तोएबाच्या वतीने जिहादी लढाई करण्यासाठी सहभागी झाला.

२६/११ हल्ल्यातील एकमेव जीवंत अतिरेकी अजमल कसाबला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली. त्याने दिलेल्या जबाबात या हल्ल्यात एका भारतीयाचा सहभाग असल्याचे काही पुरावे होते. एक भारतीय ट्रेनर ज्याला आम्ही अबू जिंदाल नावाने ओळखतो, त्याने हल्ला करणाऱ्या १० अतिरेक्यांना काही आवश्यक हिंदी शब्द शिकवले. हल्ल्याच्या वेळी त्यानेच कराचीतील कंट्रोल रूममधून अतिरेक्यांना व्हाइस ओव्हर इंटरनेट लाइनवर सूचना दिल्या.

अनेक महिने गुप्त माहिती गोळा केल्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोने २०१२ मध्ये सौदी अरबमध्ये जबीउद्दिन अन्सारीचा ठावठिकाणा शोधून काढला. पण सौदी अरबची गुप्तहेर संस्था रियासत अल इस्तिकबरात अल अमाहने पुरावे मागितले. तर रियाधमधील पाकिस्तानी दूतावासाने जबीउद्दिन अन्सारीकडे जो पासपोर्ट आहे, त्यावर त्याची ओळख रियासत अली अशी आहे, ती खरी असल्याचा दावा केला.

पुरावे गोळा करण्यासाठी डीएनए चाचणी करणे आवश्यक होते. जबीउद्दिन अन्सारीच्या आईवडिलांनी डीएनए चाचणीसाठी रक्त देण्यास पोलिसांना नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी जबरदस्ती करण्याऐवजी कौटुंबिक भांडणाचा फायदा उचलला. एका नातेवाईकाने जबीउद्दिन अन्सारीच्या वडिलांवर चाकू हल्ला केला. चाकूने निघालेले हे रक्त डीएनए प्रोफाइलसह सौदी अरबला पाठवण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्येच जबीउद्दिन अन्सारीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. पण ज्या परिस्थितीत आपणाला भारतात आणण्यात आले, तीच अवैध आहे, असा जबीउद्दिन अन्सारीचा दावा आहे.

याच दरम्यान जबीउद्दिन अन्सारी आणि त्याच्या साथीदारांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शस्त्रास्त्र वाहतूक प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणात शिक्षा झालेल्या अनेक लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!