छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या म्हणजेच सुरक्षितता वाढली असे होत नाही. तर ’नागरी संस्कृती’त अपेक्षित असलेला दर्जा व समानतेची वागणूक महिलांना मिळणे गरजेच आहे, असा सूर महिला सुरक्षितता कार्यशाळेत निघाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने ’महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ संदर्भात शुक्रवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यापीठातील विभागप्रमुख सहभागी झाले. विद्यापीठाच्या नाटयगृहात सकाळी १० ते ५ या दरम्यान ही कार्यशाळा झाली. कुलगुरु डॉ.विजय पुâलारी अध्यक्षस्थानी होते. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.अर्चना गोंधळेकर, सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा, दामिणी-भसेसा सेलल्या प्रमुख तेजश्री पाचपुते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ.रणजितसिंह निंबाळकर, कार्यशाळेच्या समन्वयक डॉ.पुष्पा गायकवाड यांची मंचावर उपस्थिती होती.
‘रामायण, महाभारत काळापासून कोणत्याही काळात महिलांना दोष देणे थांबवले पाहिजे. आपण आता माहिती तंत्रज्ञान युगात असून मानसिकताही अधुनिक असणे गरजेचे आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे’, असे विभागीय आयुक्त गावडे म्हणाले.
‘महिला सुरक्षिते’ संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची नैतिक जबाबदारी कुटूंबप्रमुखांसह सर्व सदस्यांची आहे, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. या संदर्भात विद्यापीठ स्तरावर उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक केले यांनी प्रास्ताविक केले. भरोसा सेलच्या प्रमुख तेजश्री पाचपुते यांनी स्त्रीयांच्या सुरक्षितेसंदर्भातील विविध कायद्याची सविस्तर माहिती दिली. डॉ.कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन तर श्रीमती मीरा मस्के यांनी आभार मानले.
महिला छळांचे १८० प्रकार: खिंवसरा
महिलांचा विविध १८० प्रकारे छळ होत असल्याचा निष्कर्ष अभ्यासाअंती निघाला आहे. याचा विचार करुन अशा प्रकारच्या लोकांचे केवळ समुपदेशन करुन चालणार नाही तर त्यांचे कान उपटण्याची वेळ आली आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिंवसरा म्हणाल्या. ‘नॅशनल ब्युरो ऑफ क्राईम रेकॉर्ड’चा ऑगस्ट महिन्यात अहवाल प्रसिद्ध झाला. त्यातील महिला छळाची वाढलेली आकडेवारी चिंताजनक आहे, असेही मंगला खिंवसरा म्हणाल्या.
सुरुवात घरापासून करा:गोंधळेकर
‘चॅरिटी बिगिन्स अॅट होम’ असे म्हटले जाते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या घरातील सर्व महिलांना सन्मानाची वागणूक देऊन याची सुरुवात करा, असे आवाहन विधिज्ञ अॅड. अर्जना गोंधळेकर यांनी केले. भंवरीदेवी, निर्भया व आता कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना हा आपल्या समाजाचा मानसिक स्तर घसल्याची चिन्हे आहेत, असे गोंधळेकर म्हणाल्या. विशाखा, पॉक्सो यासह विविध कायद्या संदर्भात अॅड.गोंधळेकर यांनी सोउदाहरण मार्गदर्शन केले.
‘विशाखा समिती’ नसल्यास ५० हजारांचा दंड
विद्यापीठ अनुदान आयोगाने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळासंदर्भात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक केले आहे. ज्या महाविद्यालयात अशी समिती नसेल त्यांच्याकडून ५० हजारांचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे.त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, असे अॅड.अर्चना गोंधळेकर म्हणाल्या.