नवी दिल्लीः वाढलेले तापमान आणि असह्य झालेल्या उकाड्यामुळे देशभरातील नागरिक हैराण झालेले असतानाच भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी अपडेट दिली आहे. येत्या २४ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
नैऋत्य मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन होण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
यापूर्वी हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून ३१ मे ते १ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. आता एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची नवीन अपडेट हवामान विभागाने दिल्यामुळे प्रचंड तापमान आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
बंगालच्या उपसागरात मान्सून मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यात मान्सून लवकर पोहोचण्यास मदत होईल. ईशान्य भारतात मान्सून ५ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पुढच्या ७ ते ८ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.