नवी दिल्लीः मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेवर दाखल होईल. ३१ मे रोजी केरळात मोसमी वाऱ्यांचे आगमन होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. केरळात मान्सूनचे आगमन लवकर होत नसून तो त्याच्या सामान्य तारखेच्या आसपासच केरळात येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान वाढले आहे. दक्षिण भारतात सुरू असलेला जोरदार पूर्वमोसमी पाऊस, दक्षिण चीनच्या समुद्रातील ढग आणि वाऱ्याची स्थिती तसेच नैऋत्य आणि वायव्य हिंदी महागरातील वाऱ्याची दिशा आणि वेग मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत मोसमी पाऊस केरळमध्ये २९ मे ते ८ जूनच्या दरम्यान दाखल झाला आहे. २०१९ मध्ये ८ जून रोजी, २०२० मध्ये १ जून रोजी, २०२१ मध्ये ३ जून रोजी, २०२२ मध्ये २९ मे रोजी आणि २०२३ मध्ये ८ जून रोजी केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. यंदा मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा चार दिवस आधी किंवा चार दिवस जास्तीचे धरले जातात.
भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशात मोसमी पाऊस शेतीसाठी महत्वाचा आहे. जवळपास ५२ टक्के शेतीचे क्षेत्र मोसमी पावसावरच अवलंबून आहे. जून आणि जुलै महिने पावसाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या दोनच महिन्यांत खरिपाच्या पेरण्या आटोपल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे म्हणावा तसा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा स्थितीत यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्यामुळे शेतीबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.