मुंबईः राज्यात मान्सून सक्रीय झाला असून राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. आता पुढील आणखी पाच दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. म्हणजेच काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार तर काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, पुण्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने विदर्भातील जवजवळपास सर्वच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचाच अर्थ या भागात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, जालना अकोला, नांदेड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच पुढचे पाच दिवस या जिल्ह्यांत वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील चार-पाच तासांत मुंबईतील पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने ठाण मांडले आहे.
पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. लातूर, सांगली जिल्ह्यात संततधार सुरू आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि औरंगाबाद जिल्ह्यातही रिमझिम सुरू आहे. आता पुढील पाच दिवस मान्सून सक्रीय राहणार असल्याने राज्यभर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.