
मुंबईः एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत चालला असतानाच दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पाच दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्या (२९ मार्च) रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर जिल्हा, सांगली विजांच्या कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, सातारा घाट, सोलापूर, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
३० मार्च रोजी सातारा घाट आणि सातारा जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर जिल्हा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव (उस्माबाद) जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
३१ मार्च रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर जिल्हा, सातारा घाट, सातारा जिल्हा, सांगली, सोलापूर, बीड आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस मराठवाडा, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वातावरण ढगाळ रहाण्याची शक्यता आहे.