नांदेड/मुंबईः नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज शुक्रवारी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात मागील २४ तासांत ६४.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ३६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज नांदेडसह राज्यातील ११ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आज शुक्रवारी लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर २२ ते २४ जुलैदरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वहात आहेत. जिल्ह्यातील बिलोली, देगलूर आणि मुखेड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
नांदेड आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे आज शुक्रवारी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. चार दिवसांच्या तुफान पावसानंतर मुंबईत पावसाने उसंत घेतली असून चाकरमाने सुखरुप कामावर गेले आहेत. कोल्हापुरात पंचगंगा नदीची संथ गतीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असून जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत ३ फुटांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात चार दिवस मुसळधार
महाराष्ट्रासह देशभरात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रायगडसह ठाणे, लाघर या जिल्ह्यांसाठी आज हवामाना खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काल ईर्शाळवाडी येथे दुर्घटना झालेल्या रायगड जिल्ह्यातही आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील चार दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.